महायुतीच्या धोरणानुसार राज्यभर आज संयुक्त मेळावे झाले. नगरला विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार (आता अजितदादा गट) यांच्यातील लढतीची पूर्वीपासून चर्चा आहे. त्यामुळे दोघांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा सुरू आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या निर्णयानंतरही त्यात बदल झाला नाही. त्यामुळे आजच्या महायुतीच्या मेळाव्यास आमदार लंके उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणं आमदार लंके यांनी पाठ फिरवलीच. मात्र, सोबतच अजितदादा गटाचे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरविली.
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप फक्त उपस्थित होते. अर्थात जगताप आणि विखे हे दोघे अधीपासूनच शहराच्या विकासासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत. एरवीही त्यांचे एकत्रित अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती अपेक्षितच होती. याशिवाय अकोल्याचे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.
यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी याला पक्षाच्या समन्वयकांना जबाबदार धरले.
विखे पाटील म्हणाले, ‘हा महायुतीचा मेळावा आहे. ज्या, त्या पक्षाची जबाबदारी आहे. पक्षाच्या समन्वयकाची यात मोठी जबाबदारी होती. पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी होती. परंतु काही कारणास्तव ते राहिले नसतील, ते मला काय कारण माहीत नाही. पण हे आमदार पक्षापेक्षा, महायुतीपेक्षा वेगळी भूमिका घेतली, असे मला वाटत नाही’, असेही विखे पाटील म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.