विद्यापीठ नामविस्तार दिनाला सकाळपासून आंबेडकरी अनुयायांची पावले विद्यापीठ प्रवेद्वाराकडे वळल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या भीमबांधवांनी आपल्या मुलाबांळासह मोठ्या शिस्तीत विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली. सकाळी बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागातून आलेल्या भीमसैनिकांची शनिवारी रात्रीपासूनच विद्यापीठ प्रवेशद्वारावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परिसरात रोषणाई करण्यात आली. रविवारी पहाटेपासून विद्यापीठ प्रवेशद्वारावर अनुयायी येत होते. अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन केल्यानंतर विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील नामांतर लढ्यात शहीद झालेल्यांच्या स्मृती जपणाऱ्या शहीद स्तंभाला अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला. भीमगीत गायन कार्यक्रम, पुस्तकविक्रीचे स्टॉल, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांनी लक्ष वेधले. परिसरात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावण्यात आली. विविध शहरांतून आलेल्या विक्रेत्यांनी वैचारिक पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती. दिनदर्शिका, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लहान-मोठे पुतळे, महापुरुषांची छायाचित्रे, फोटो विक्रीची दुकानेही होती. सामाजिक संघटना, पक्ष, कर्मचारी संघटनांतर्फे अन्नदान, पाणी वाटप, महारक्तदान शिबिर घेण्यात आले. विविध पक्ष, महिला मंडळे यांच्या वतीने अनुयायांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. टी-शर्ट, खेळणीची दुकानेही परिसरात थाटली होती. भीमशक्तीतर्फे महाभोजन दान, कर्मचारी संघटनेतर्फे पुलाव वाटप करण्यात आले. आधार कार्ड नोंदणी, टपाल सेवेसह भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा व संवर्धन समितीतर्फे ईव्हीएम मशीन हटाव उपक्रम घेण्यात आला.
समता सैनिक दलाची मानवंदना
समता सैनिक दलाच्या वतीने सकाळी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास; तसेच शहीद स्तंभास सलामी देण्यात आली. या वेळी महिला भीम सैनिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.