गेल्या काही वर्षांमध्ये कोकणातील सिंधुदुर्गपासून सगळ्या जमिनी या परप्रांतीयांनी विकत घेतल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्याकडून अल्प दरामध्ये फसवणूक करून या जमिनी घेण्यात आल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. आज हे सगळे जमीनवाले देशोधडीला लागले आहेत. आता जी उर्वरित जमीन आहे ती कोणता नवीन प्रोजेक्ट येत असेल तर सरकारला द्या, त्याचे पैसे डायरेक्ट तुम्हाला मिळू देत, अशी राज ठाकरे यांची भूमिका असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे. एखादा प्रकल्प येणार आहे याची माहिती काही एजंटना असते. हे एजंट स्थानिक लोकांच्या भोळेभाबडेपणाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी अतिशय कमी दरात विकत घेतात, असाही आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मराठी मूळ शेतकऱ्याकडे ही जमीन टिकून राहावी, अशी भूमिका आहे. याचा जो काही मोबदला आहे तो सरळ थेट शेतकऱ्यांना मिळावा, अशी भूमिका आहे आणि याचसाठी आजची जमीन परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.
मनसेच्या शहराध्यक्षपदी संदीप राणे
मनसेच्या मिरा-भाईंदर शहराध्यक्ष पदी संदीप राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच राणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मिरा-भाईंदरमधील मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षांतर्गत गटबाजीमुळे ही जबाबदारी कोणाकडे येते, याकडे लक्ष लागले होते. शहराध्यक्ष पदासाठी संदीप राणे, सचिन पोपळे व इतर काही नावे चर्चेत होती. अखेर विधानसभा प्रमुख पदी असणाऱ्या संदीप राणे यांची शुक्रवारी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष पदी असणाऱ्या हेमंत सावंत यांची उपशहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राणे यांच्या नियुक्तीमुळे जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून ते राज ठाकरे यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. तोडगा न निघाल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचे काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राणे यांनी सर्वांना एकत्र घेत, पक्ष वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.