मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहा जणांना ताब्यात घेतले आहे. मोहोळ खूनप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी १३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये तीन मुख्य आरोपी आहेत. त्यांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या. तर , अन्याय आरोपींचा कटात सहभाग असल्याचा संशय आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वेगळाच असण्याची शंका पुणे पोलिसांना होती त्यानुसार वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत तपास करण्यात येत होता.
शरद मोहोळच्या खुनानंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलिसांची मदत घेण्यात आली.
सहाय्यक आयुक्त गोवेकरांची शंका ठरली खरी
शरद मोहोळ चा खून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी विठ्ठल शेलार याला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर शेलार माघारी गेला. मात्र तपासात अनेक गोष्टी पुढे आल्यानंतर आता सहाय्यक आयुक्त गोवेकर यांची ती शंका खरी ठरल्याचे दिसून येते.
कोण आहे विठ्ठल शेलार?
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी काम करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारचे नाव पुढे आले. पिंट्या मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून २०१४ मध्ये त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. इकडे शेलार यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली होती.