राम मंदिर उभं राहिलं पण ‘कारसेवक’ उपेक्षित राहिला, आयुष्याच्या संध्याकाळी जगतोय हलाखीचं जीवन

मिरजेत शेतकरी कुटुंबात जन्म, बाळासाहेबांच्या विचाराने भारावले अन्…

मिरजेतील शेतकरी कुटुंबात १६ नोव्हेंबर १९६५ रोजी जन्मलेले सुरेश शेळके हे कट्टर शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावलेले सुरेश शेळके यांनी लहान वयातच शिवसेनेचे काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात १९८२ – ८३ च्या काळात आप्पासाहेब काटकर, लतीफ कुरणे, रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, गजानन आडके आणि रावसाहेब खोजगे यांनी सांगलीत शिवसेना वाढवण्याचे काम सुरू केलं होतं. त्यावेळी शेळके कुटुंबातील प्रकाश, दिलीप आणि सुरेश या तीन मुलांनी मिरजेत शिवसेनेच्या शाखा काढल्या. शिवसैनिकांच्या साह्याने सुरेश शेळके यांनी त्यांनतर मिरज परिसरात जवळपास ३६ शाखा सुरू केल्या होत्या. शेळके त्यानंतर शिवसेनेचे शहर उपप्रमुख सुद्धा होते. गोरगरिबांच्या सुख दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे, याबरोबरच गणेश तलावाचे सुशोभीकरण, रुंगठा उद्यानाचे नूतनीकरण, टांगसा मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला. बंद पडलेली हरबा तालीम शेळके यांनी सुरू केली. दहीहंडीत जिंकलेले पैसे या तालमीसाठी खर्च केले होते.

१९९२ मध्ये राम मंदिर उभारणीसाठी आंदोलन, सहकाऱ्यांसोबत अयोध्येत दाखल

भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथमधून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली. ही यात्रा अडवून लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली होती. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. सुरेश शेळके, प्रकाश भोसले, राणा पाठक, प्रताप पाठक यांनी मिरज बंद केली. यादरम्यान, त्यांना अटक झाली होती. नंतर १९९२ मध्ये राम मंदिर उभारणीसाठी आंदोलन सुरू झालं. उत्तरप्रदेशमध्ये कारसेवकांची धरपकड सुरू झाली. ६ डिसेंबर १९९२ साठी मिरजेतून अनेक कारसेवक आयोध्येच्या दिशेने निघाले. सुरेश शेळके, धनंजय सूर्यवंशी, राजू शिंदे, वासू जकाते आणि शहाजी कांबळे यांनी सुद्धा आयोध्येकडे जाण्याचा निर्णय घेतला. देशभरातून लाखो कार सेवक आयोध्येत दाखल झाले होते. विविध हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिस त्या ठिकाणी उपस्थित होते.

मोठे तारेचे कंपाउंड ओलांडून सुरेश शेळके थेट बाबरीच्या घुमटावर

या ठिकाणी उपस्थित असलेल्या कारसेवकांना शांततेचं आवाहन केलं जात होतं. मात्र, मिरजेतले हे पाचजण मागील बाजूने मशिदीच्या परिसरात दाखल झाले. मोठे तारेचे कंपाउंड ओलांडून सुरेश शेळके घुमटावर चढले. त्यानंतर छन्नी, हातोडा, पार, कैच्या आणि दोर घेवून अन्य कारसेवक घुमटावर आले. घुमटावर प्रहार केले आणि काही काळातच तो ढाच्च्या जमीनदोस्त झाला. कारसेवक आपापल्या घरी निघत असताना रस्त्यावर झाडे कापून टाकण्यात आली होती. रेल्वेचे रूळ सुद्धा उखडून टाकण्यात आले होते. दुसऱ्या गटाकडून रेल्वेवर दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आल्या. कारसेवक मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी आले. सुरेश शेळके हे मिरजेत आल्यानंतर त्यावेळी सीबीआय आणि सीआयडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

बाळासाहेब ठाकरेंकडून सत्कार

फ्रंट लाईन या मासिकातून सहा डिसेंबर १९९२ च्या घटनेसंदर्भातील फोटो आणि बातमी प्रसिद्ध झाली. त्या बातमीत छातीवर शिवसेनेचा बिल्ला असलेले सुरेश शेळके छायाचित्रात ठळकपणे दिसत होते. या बातमीची माहिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कळल्यानंतर ठाकरे यांनी कार सेवक सुरेश शेळके यांना मुंबईत बोलावून घेतले. सुरेश शेळके आणि त्यांचे मित्र जेष्ठ पत्रकार धोंडीराम शिंदे मुंबईला गेले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश शेळके यांचा सत्कार केला.

शिवसेनेने उमेदवारी नाकारली, भाजपकडून नगरसेवक झाले

शिवसेना आणि सामाजिक कार्य करत असताना अनेक विषयावर शेळके यांनी आंदोलनं उभी केली. महानगरपालिका होण्यासाठी मोठे जनआंदोलन उभं केलं. मिरजेत अरब हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्या आंदोलनात शेळके अग्रभागी होते. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपकडून ते नगरसेवक झाले. वॉर्डात विविध विकास कामे केली. महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभा राहिलेल्या सुरेश शेळके यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ते राजकारणापासून दूर होत गेले. मिरजेत १९८२ पासून शिवसेनेचे काम करत असताना अनेक आंदोलनाच्या वेळी शेळके कुटुंबातील तिघा भावंडांच्या वर अनेक केसेस पडल्या. सुरेश शेळके यांना अनेक आंदोलनाच्या वेळी अटक झाली. कित्येक महिने जेलमध्ये त्यांची रवानगी होती. वयाची साठी गाठलेले सुरेश शेळके हे उपेक्षितच जीवन जगत आहेत.

भाड्याच्या खोलीत हलाखीचे जीवन, पण आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार

ब्राह्मणपुरीतील भाड्याच्या दोन खोलीमध्ये सध्या ते राहत आहेत. पत्नी, मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मुलीचं लग्न झालं असून ती सासरी आहे. सुरेश शेळके त्यांची पत्नी आणि मुलगा असे तिघे जण सध्या मिरजेत वास्तव्यास आहेत. मुलगा नोकरी करत असून बेताच्या परिस्थितीत शेळके हे जीवन जगत आहे. कोणा विषयी खेद ना खंत, मात्र प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा स्वतःला कट्टर हिंदुत्व मानून तहयात हिंदुत्वाचा पुरस्कार करणार असे ते सांगतात. हिंदुत्व आणि राजकारणाची सांगड बसू शकत नाही, असा विचार करून सुरेश शेळके यांनी स्वतःहून राजकारणातून निवृत्ती घेतली. मात्र, आयुष्यभर शेळके यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार धारेवर देव, देश आणि धर्म यानुसार त्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाचे काम सुरू ठेवल आहे.

Source link

22 january 2024Miraj Karsevakram mandirRam Mandir Consecration AyodhyaRam Mandir Consecration Ayodhya ceremonyRam Mandir newsShivsena ShivsainikStory Of Karsevakकारसेवकराम मंदिर अयोध्या
Comments (0)
Add Comment