हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी (११ जानेवारी) सकाळी आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला होता. कुंडलिक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलिक जाधव (६०), आकाश कुंडलिक जाधव (२६) अशी मयतांची नावं आहेत.
कुंडलिक जाधव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा आकाश हा सिरसम येथे घेऊन जात होता. यावेळी त्याची आई कलावती देखील त्यांच्या सोबत होती. डिग्रसवाणी येथून काही अंतरावर असलेल्या एका वळणावर आकाश याला दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून तिघांचाही मृत्यू झाल्याचं आरोपी मुलगा महेंद्र जाधव याने पोलिसांना सागितले होते.
मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर संशयास्पद गोष्टी लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या अपघाताचा तपास करण्याचे आदेश बासंबा पोलिसांना दिले होते. लागलीच बासंबा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी आपल्या तपासाचे सूत्र हलवले आणि यामध्ये त्यांना मदत झाली ती जमादार नाना पोले, खिल्लारे, खंडेराव नरोटे यांची. पोलिसांनी घटनास्थळी तसेच मयतांच्या घरी जाऊन तपास सुरू केला. मयतांच्या घरामध्ये स्वच्छता केलेली दिसून आल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. लागलीच पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तिघांचा खून करून डिग्रसवाणी शिवारात फेकून दिले आणि अपघाताचा बनाव केल्याचं कबुल केलं. त्यानंतर पोलिसांनी महेंद्र जाधव याला अटक केली.
आरोपी महेंद्र जाधववर कलम भादंवीप्रमाणे ३०२, ३२३, ५०४ , ५०६ , २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत आई-वडील आणि भाऊ हे आरोपीला पैसे देत नाहीत आणि नातेवाईकांमध्ये सतत बदनामी करतात त्याचा राग मनात धरून त्याने हत्येसारखे भयंकर कृत्य केले. आता या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News