मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली असतानाच या प्रवेशाच्या निमित्ताने मुंबई काँग्रेसला खिंडार पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आगामी काळात काँग्रेसचे आणखी काही पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या अगोदर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या कामाविरोधात नाराजी व्यक्त करीत दक्षिण मध्य मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता थेट मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षाला लागलेल्या या गळतीमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीही याची गंभीर दखल घेतल्याची माहिती मुंबई काँग्रेसमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत रविवारीच मुंबई काँग्रेसमधून एक गुप्त अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतील इतर काही महत्त्वाच्या नेत्यांकडेही हा अहवाल पाठविण्यात आला असून या अहवाला देवरा यांच्यासोबत नेमके किती पदाधिकारी गेले आहेत, त्यांच्यावर कोणती जबाबदारी होती याशिवाय अन्य माहितीचा समावेश करण्यात आल्याचे कळते.
तेवीस जणांचे निलंबन आणि बैठकांचे आयोजन
या निलंबनानंतर मुंबई काँग्रेसने सोमवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू केल्याचे दिसून आले. वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दक्षिण मुंबईतील जवळपास सर्वच कार्यकर्त्यांची बैठक बोलवित हे सर्व कार्यकर्ते पक्षासोबत राहतील, यासाठी मार्गदर्शन केल्याचे कळते. त्याचवेळी देवरा यांच्यासोबत गेलेल्या तेवीस जणांचे पक्षाकडून निलंबन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या बैठकीनंतर गायकवाड यांनी दक्षिण मुंबईतील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासगीत चर्चा केल्याची माहिती यावेळी काँग्रेसमधील सूत्रांकडून देण्यात आली.
अतंर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडताना जास्तीत जास्त पदाधिकारी सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि कामगार नेते भाई जगताप यांनी यावेळी अनेकांना राजीनामा न देण्यासाठी मनधरणी केल्याची माहिती सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनेकांनी दिली. मात्र या बैठकीसाठी भाई जगताप यांनाच निमंत्रित न करण्यात आल्याने अनेकांनी या बैठकीतच नाराजी व्यक्त केल्याचे कळते. भाई जगताप यांनी दक्षिण मुंबईतील एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर येथील एका मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढली होती. मात्र त्यानंतरही त्यांना या बैठकीपासून लांब ठेवण्यात आल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.