गेल्या महिन्याच्या मध्यावर शहरात किमान तापमान १२.५ अंशांवर होते. महिनाभराच्या कालावधीनंतर आता ११.१ अंश इतकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या थंडीत शहरात १० अंशांच्या खाली तापमानाची नोंद झालेली नाही. यंदा नाशिकमध्ये दरवर्षीच्या तुलनेत फारशी थंडी जाणवलेली नाही. तापमानात रात्रीतून चार अंशांनी घट झाल्याने सोमवारी सकाळपासून हवेत गारवा होता. काही दिवसांपूर्वी शहर व जिल्ह्यातील काही गावांमध्ये दाट धुक्याची चादर निर्माण झाली होती. शहरात सोमवारी किमान ११.१, तर कमाल २९.३ तापमानाची नोंद करण्यात आली.
निफाडचा पारा ६ अंशांनी घसरला
जानेवारी महिना संपत आला असतानाही बोचऱ्या थंडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना सोमवारच्या कडाक्याच्या थंडीने हुडहुडीचा अनुभव दिला. एकाच दिवसात तापमान सहा अंशांनी घसरले. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी ६.५ इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी १५ जानेवारीला ६.३ इतके तापमान होते. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात रविवारपर्यंत ११ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. रविवारी १२.२, तर सोमवारी यात अचानक घट होऊन ६.५ अंशांपर्यंत तापमान नोंदवले गेले.
गव्हाला फायदा, द्राक्षाला धोका
गहू, हरभरा, उन्हाळ कांदा या पिकांसाठी थंडीची गरज असते. मात्र, थंडी गायब झाल्याने पिकांवर परिणाम झाला होता. मात्र यापेक्षा तापमान खाली आले तर द्राक्षबागांना धोका आहे. द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती या वेळी व्यक्त करण्यात आली.
Read Latest Maharashtra News And Marathi News