पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांबाबत BMC चे खास प्लॅनिंग; ६०० कोटी खर्च करणार, नियोजन काय?

मुंबई : रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सध्या आयआयटीकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यांचा अहवाल दहा दिवसांत येईल. या अहवालानंतरच कामे करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्या पूर्व मुक्तमार्गावर (इस्टर्न फ्री वे) ‘मायक्रो सरफेसिंग’चे काम सुरू आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग हा २३.५५ किमीचा हा मार्ग मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर इत्यादी भागांना जोडतो. या मार्गाला शीव-पनवेल महामार्ग आणि सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता, पूर्व मुक्त मार्ग जोडले जातात. तर पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबईतील पश्चिम उपनगरांतून जाणारा महत्त्वाचा मार्ग असून साधारण २४ किमी लांबीचा हा द्रुतगती महामार्ग दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे इत्यादी उपनगरांना जोडतो. दोन्ही मार्गांवर डांबरी रस्ते असून काही पट्ट्यात ते समतोलही नाहीत. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांचे ‘मायक्रो सरफेसिंग’चे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

दहा दिवसांत अहवाल

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरही हे काम करण्यासाठी आयआयटीकडून अभ्यास सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. कोणत्या पट्ट्यात या कामाची गरज आहे, काम करताना येणाऱ्या अडचणी आदी अहवाल आयआयटीकडून तयार केला जाणार आहे. हा अहवाल दहा दिवसांत सादर होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. त्यानंतरच निविदा काढून कंत्राटदारांना काम सोपविले जाईल. साधारण दोन्ही मार्गांवर मिळून ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
बीड बायपासचे काम रखडले; स्थलांतरित जलवाहिनीची जोडणी, अन्य कामांच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा
मायक्रो सरफेसिंग म्हणजे काय?

सध्या मुंबईत पहिल्यांदाच मायक्रो सरफेसिंगचे काम पूर्व मुक्त मार्गावर (इस्टर्न फ्री वे) सुरू आहे. यामध्ये डांबरी रस्त्याचे आयुर्मान वाढवण्याच्या दृष्टीने पुनर्पृष्ठीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पारंपरिक रस्ता पृष्ठीकरण करताना रस्त्यावरील डांबराचा संपूर्ण सहा इंचाचा थर काढून पूर्ण नवीन थर टाकला जातो. तर नव्याने पुनर्पृष्ठीकरण करताना डांबराचा रस्ता खराब होऊ नये म्हणून त्यावर सुमारे सहा ते आठ मिलीमीटरचे मजबूत असे आवरण केले जाते. यामध्ये एका दिवसात सरासरी एक किलोमीटरच्या रस्त्याचे मजबूतीकरण करणे शक्य होते. यामध्ये सिमेंट, पाणी, खडी आदींचे मिश्रण मशिनच्या सहाय्याने तयार करून संयंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर टाकण्यात येते. त्यामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढते व मजबुतीकरणही होते.

नऊ किमी अंतराचे काम पूर्ण

पूर्व मुक्त मार्गावर रात्री १२ ते पहाटे चार या वेळेत काम हाती घेऊन टप्प्याटप्याने भक्ती पार्क ते पी. डिमेलो मार्ग म्हणजेच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बाजूचे मायक्रो सरफेसिंग पूर्ण करण्यात आले आहे. हे अंतर नऊ किमी असून दुसऱ्या बाजूचेही दीड किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूचेही काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. यामुळे रस्त्याचे आयुर्मान चार ते पाच वर्षांनी वाढण्यास मदत मिळणार आहे.

Source link

BMCMicro surfacing on Western-Eastern Expresswaymicro surfacing technologyMumbai Municipal Corporationmumbai newswestern and eastern expresswaywestern-eastern expressway
Comments (0)
Add Comment