छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाल्याच्यानिमित्ताने आमदार लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी शिवचरित्राची माहिती देणारी शिवस्वराज्य यात्रा दक्षिण नगर जिल्ह्यातून पंधरा दिवसांपूर्वी सुरू केली होती. तिचा समारोप मंगळवारी (१६ जानेवारी) नगर शहरामध्ये झाला. सक्कर चौकातून आलेल्या या यात्रेने इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर आमदार लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बायकोची निवडणूक लढविण्याची इच्छा… अजितदादांसोबत बोलणं झालंय?
लंके म्हणाले, माझी पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणारच, अशा केलेल्या घोषणेबद्दल ‘ध’ चा ‘मा’ झाला आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात, तसा तो आमच्याही आहे. पत्नी राणी यांचे ते वेगळे मत आहे. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कोणतीही निवडणूक मी लढवू शकतो. मात्र, लोकसभेच्या माझ्या उमेदवारीबाबत मला विचारणाही झाली नाही व कोणाशी माझी चर्चाही झालेली नाही, असेही लंके यांनी सांगितले.
कुणी काय भाष्य करावं, हा त्यांचा प्रश्न, आपण काम करत राहायचं
रविवार नगरमध्ये झालेल्या महायुती मेळाव्यास अनुपस्थितीसंबंधी विचारले असते ते म्हणाले, यासंबंधी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा आपल्याला फोन आला होता, पण त्यादिवशी मी बाहेर असल्याने मेळाव्यात सहभागी झालो नाही. माझ्याबद्दल कोणी काय भाष्य करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ते मोठे आहेत व मी छोटा आहे. कोणी काय केले, ते पाहण्यात वेळ खर्च न करता त्याकडे दुर्लक्ष करतो व माझ्या पद्धतीने काम करतो, असेही लंके म्हणाले.
हस्तक्षेप नको म्हणून समारोपाला आलो
पत्नीने काढलेल्या यात्रेसंबंधी लंके म्हणाले, शिवस्वराज्य यात्रेचे संयोजन राणी लंके यांनी सक्षमपणे केले. यात्रेला प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या कष्टाचे चीज झाले. यात्रेचे नियोजन माझ्याकडे नव्हते व आपल्या उपस्थितीने यात्रेत हस्तक्षेप नको म्हणून समारोपाला आलो. आज मंगळवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन असल्याने व यादिवशी समारोप करायचे नियोजन होते. त्यामुळे पुरेसा वेळ नसल्याने ही यात्रा दक्षिण नगर जिल्ह्यापुरतीच काढली. वेळ कमी असल्याने आमच्या पारनेर तालुक्यातही यात्रा नेता आली नाही, असेही लंके म्हणाले.