वरळी डोममध्ये पार पडलेल्या जनता न्यायालयाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या सुषमा अंधारे, सचिन अहिर यांच्यासह प्रमुख शिवसेना नेते उपस्थित होते. यावेळी न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडलेले कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे आणि अॅड. रोहित शर्माही उपस्थित होते.
माझ्यासोबत चला, मग जनता सांगेल गाडावा की तुडवावा!
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत. सरकार कोणाचंही असलं तरी, सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे! माझं आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा!
अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो
शिवसेना जर तुम्ही विकली असाल; तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे? असा सवाल करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसरं चॅलेंज दिलं. जर आमचे आमदार अपात्र करण्याची तुमची मागणी पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे तुम्ही नाराज होऊन कोर्टात गेलेला आहात तर ज्यांनी निकाल दिला त्याच विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना
निवडणूक आयोग शपथपत्रांवर गाद्या समजून झोपलंय का?
व्हीपचा अर्थ आहे चाबूक! चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो! आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे. आपण शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत, म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपलंय का? अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली.
आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल
आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार, की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार; हे पाहण्याची ही लढाई आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार आहे. आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल; ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन, असं सांगतानाच लोकशाही जिवंत रहाणार आहे की नाही? अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.