हायलाइट्स:
- एका १५ वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू.
- पोळा सणासाठी बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेला होता मुलगा.
- ही घटना सकाळी ८.३० वाजता एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे ही घडली.
प्रतिनिधी, जळगाव
पोळा सणाच्या निमित्ताने धरणात बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८.३० वाजता एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे ही घटना घडली. सागर ज्ञानेश्वर माळी (वय १५, रा. खर्ची, ता. एरंडोल) असे मृत मुलाचे नाव आहे. (a boy who went to wash oxen drowned in a dam in jalgaon)
सोमवारी पोळा सणासाठी एरंडोल तालुक्यातील खर्ची गावातील अनेक तरुण बैलांना अंघोळ घालण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हा सुध्दा एकदाच घरचे बैल धुण्यासाठी गेला होता. बैलांची अंघोळ झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. या ठिकाणी चिखलात पाय रुतल्याने तो बुडाला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही लोकांनी त्याला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी जळगावात आणण्याचा प्रयत्न केला. वाटेत छाती, पोट दाबुन पाणी बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. शहरात पोहचेपर्यंत सागरचा श्वासोच्छवास सुरू होता. खोटेनगर स्टॉपजवळ आल्यावर त्याची प्राणज्योत मालावली.
यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. या सागरच्या पश्चात वडील ज्ञानेश्वर दोधू माळी, आई गंगाबाई, बहिण भावना, भाऊ निर्मल असा परिवार आहे. आठवीच्या वर्गात शिकणारा सागर घरातील मोठा मुलगा होता. या घटनेनंतर खर्ची गावात शोककळा परसली. कोणीही सण साजरा केला नाही.