महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरण्याआधीच काँग्रेसचा डाव, मित्रपक्षांवर कुरघोडी!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान काँग्रेसने जागा वाटपाचे सूत्र ठरण्याआधीच मोठा डाव टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर मिशन ४५ म्हणत महायुतीने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अजून ठरले नाही. त्यातच आता काँग्रेसने १८ जानेवारी पासून राज्यात विभागनिहाय बैठका घेण्याचे जाहीर करून एक प्रकारे मित्र पक्षांवर कुरघोडी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत आपला वरचष्मा राखण्यासाठी काँग्रेसने १८ जानेवारी पासून विभाग निहाय बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. या बैठकांची सुरुवात ही अमरावती विभागापासून सुरू होणार आहे.

गेल्याच आठवड्यात काँग्रेसने रमेश चेन्नीथला यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, चंद्रकांत हांडोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या बैठका सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत. १८ जानेवारी रोजी अमरावती येथे, २० जानेवारी रोजी नागपूर येथे, २३ जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रची बैठक पुणे येथे, कोकण विभागाची २४ जानेवारी रोजी भिवंडी येथे, २७ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे तर २९ जानेवारी रोजी मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे होणार आहे. त्यामुळे बैठकांचे वेळापत्रक जाहीर करून काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीत ८० टक्के जागांचा फॉर्म्युला ठरला- विजय वडेट्टीवार

महाविकास आघाडीतील ८० टक्के जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. उर्वरित जागांचा फॉर्म्युला ही लवकरच ठरेल. त्यामुळे आम्ही एक विचाराने फॉर्म्युला ठरवत असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

वंचित फॅक्टर महत्त्वाचा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४१ लाख मतं मिळवली होती. तर वंचितच्या उमेदवारांमुळे राज्यातील दिग्गजांचा पराभव झाला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याची मागणी होत आहे. मात्र अजूनही इंडिया आघाडीत वंचित सहभागी होणार की नाही, हे निश्चित झाले नाही. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीत लोकसभेसाठी कोण मोठा आणि कोण छोटा भाऊ हे सुद्धा काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Source link

Congresscongress divisionwise meetingindia allianceindia alliance seat sharing formulaloksabha election 2024maharashtra Congress Divisionwise meetingकाँग्रेस विभागनिहाय बैठकालोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment