explainer: राष्ट्रवादी काँग्रेस कशी झाली राज्याच्या राजकारणातील किंगमेकर?

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२वा वर्धापन दिन
  • शरद पवार यांच्या नेतृत्वात झाली होती पक्षाची स्थापना
  • राष्ट्रवादी पक्षाची जडणघडण कशी झाली?

सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२वा वर्धापन दिन आहे. स्थापनेपासून सत्तेत कायम वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जडणघडण कशी झाली?; याचा घेतलेला आढावा.

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. राजकारणात मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.

काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांच्या साथीने सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शिवाजी पार्क येथे पक्षाची स्थापना करण्यात आली. मुळ विचारधारा काँग्रेसची असल्यामुळं आपण आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावं असं ठरलं. शिवाजी पार्क येथे पहिलं अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरु झाली. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात राज्यात निवडणुका लागल्या. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत सत्तेत आला. पक्षाच्या २२ वर्षांच्या इतिहासात हा पक्ष फक्त ५ वर्ष सत्तेबाहेर राहिला आहे.

२०१४मध्ये महाराष्ट्रासह देशभरात मोदी लाटेच्या तडाख्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर जावं लागलं. लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, २०१९च्या विधानसभा निवणडणुकीत हे चित्र पालटले. १०१९मध्ये भाजपा- शिवसेना महायुतीचा रथ रोखणे अवघड असताना, राष्ट्रवादीनं निकरानं लढा दिला. साताऱ्यातील पावसातील वादळी सभेनं राष्ट्रवादीला एक नवी उर्जा दिली.

विधानसभा निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेना आणि काँग्रेस या भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जातात. शिवसेनेला महायुतीतून बाहेर घेऊन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे असो, शरद पवारांनी राजकीय डावपेच यशस्वी करून दाखवले आहेत.

Source link

NCP foundation daySharad Pawarराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी पक्षाची स्थापनाशरद पवार
Comments (0)
Add Comment