मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरचे नाव मोहम्मद जाहिद अली खान असे आहे. परभणी शहरातील एकबाल नगर परिसरात मासूम हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल डॉक्टर मोहम्मद जाहीर आली आणि त्यांची डॉक्टर पत्नी हे दोघे मिळून चालवतात. २०१५ पासून डॉक्टरकी पेशा करत असलेल्या मोहम्मद खान यांच्या हॉस्पिटलमध्ये २०१८ साली डॉक्टर नवनीत या प्रॅक्टिस करण्यासाठी आल्या होत्या. चार महिने डॉक्टर नवनीत यांनी मासूम हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली. यादरम्यान डॉक्टर नवनीत यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यामध्ये केकही कापण्यात आला.
केक कापताना आणि वाढदिवस साजरा करताना डॉक्टर मोहम्मद जाहीर अली यांनी डॉक्टर नवनीत यांच्यासोबत सेल्फी फोटो काढले होते. चार महिन्यानंतर डॉक्टर नवनीत या आपली प्रॅक्टिस पूर्ण करून दवाखाना सोडून गेल्या. डॉक्टर मोहम्मद आणि डॉक्टर नवनीत यांचे सेल्फी काढलेले फोटो डॉक्टरांनी आपल्याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालवत असलेल्या सय्यद हुसेन यांच्या मोबाईलमध्ये ठेवले होते. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉक्टर मोहम्मद यांना अनोळखी मोबाईलवरून फोन आला. डॉक्टर नवनीत यांच्यासोबत सेल्फी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू आणि तुमच्या पत्नीला पाठवू, अशी धमकी देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष भेटा असेही धमकी देणाऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर यांनी वेळोवेळी फोन करून कधी दोन लाख रुपये तर कधी तीन लाख रुपये तर कधी दहा लाख रुपये असे एकूण २० लाख रुपयांची खंडणी डॉक्टरकडून वसूल केली. डॉक्टर मोहम्मद यांनी वेळोवेळी त्या खंडणीखोरास पैसे दिले. डॉक्टरने प्रतिष्ठेला घाबरुन जवळपास २० लाख रुपये दिले. नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत खंडणीचा प्रकार घडला. पण खंडणीखोरांची मागणी काही थांबत नव्हती. त्यामुळे शेवट डॉक्टर मोहम्मद यांनी कंटाळून नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले. याबाबत डॉक्टरने नवा मोंढा पोलीसात तक्रार दिली.
पोलिसांनी संबधित मोबाईल धारकाला बोलावून त्याची चौकशी केली. त्याने इतर मित्रांसोबत मिळून डॉक्टरचे सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे कबूल केले. याप्रकरणी मोहम्मद जाहेद अली खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख रहिम शेख कलीम, सुफीयान खान अकबर खान, मोहम्मद इतर खुहुस सैफुल्ला बरेख बरेखानी, वा अनोळखी साथीदारांवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.