हायलाइट्स:
- रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ
- अनेक भागांत साचलं पाणी
- पुन्हा पुराचा धोका?
चिपळूण : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली येथील बाजारपेठ परिसराजवळ नाईक पुलावर पाणी साठलं आहे. गेल्या कित्येक वर्षात कधीच पाण्याखाली न गेलेल्या दापोली शहरातील अनेक भागांत पाणी साठू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दापोली शहर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने चिंता वाढली आहे.
सोमवारी दिवसभर झालेल्या पावसानंतर दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.आंबेडकर चौक परिसरात पाणी साठलं होतं. शहरातील रूपनगर, नागरबुडी, नशेमन कॉलनी हा भागही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं.
वशिष्ठी नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली नाही!
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असलं तरी वाशिष्ठी नदी पात्राने अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नसल्यामुळे थोडा दिलासा आहे. मात्र पावसाचा असाच धुमाकूळ आणखी २४ तास सुरू राहिल्यास नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते, असं जाणकारांचं मत आहे.
दरम्यान, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूरबाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे.