छत्रपती संभाजीनगर जळगाव राज्यमार्ग हा महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर रस्त्याची दशा बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या नऊ वर्षांत रखडलेल्या कामांमुळे अपघात वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर दळणवळणाची सुविधा वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु आधीच्या कंपनीने काम सोडल्याने हे काम दीर्घ काळ रखडले होते. त्यानंतर आर. के. सी. कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे काम घेतल्यानंतर येथील कामे सुरू झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी काम पूर्णही झाले. मात्र अद्यापही काही ठिकाणी पूल आणि रस्त्याचे काम खोळंबले आहे. त्यामुळे पर्यटन, दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय कायम आहे.
अपूर्ण कामे
फुलंब्री तालुका
– चौका घाटात पुलाचे व रस्त्याचे, बिल्डा फाटा मठ पाटीजवळील पूल, आड नदीवरील पूल, महाल किन्होळा येथील पूल व ५०० मीटर रस्ता.
– सिल्लोड तालुका
केऱ्हाळा फाट्यासमोरील पूल, चिंचखेडा ते पूर्णा नदीवरील पूल व ३०० मीटर रस्ता, सिल्लोड शहर, डोंगरगाव फाटा ५ किमी रस्त्याचे काम, पालोद गावाजवळ पूल, (गोल टेक) बाळापूर फाटा रस्ता, अजिंठा गावाजवळ पूल व रस्ता ही कामे अपूर्ण आहेत.
अपघाताचे सत्र कायम
या महामार्गाचे काम सात वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा रस्ता खोदून ठेवला व काम बंद होते तर अनेक ठिकाणी आजही काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात होतात. यात अनेकांना मरण आले तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचे काम २०१७ सुरू झाले सात वर्षे झाली तरी अनेक ठिकाणची कामे अपूर्ण का आहेत, असे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अभिजित घोडेकर यांना विचारले असता, ‘कुठली कामे अपूर्ण आहेत आणि कुठली झाली आहेत, याबाबत तुम्हाला माहिती आहे तर आम्हाला का विचारता?’ असा उलट सवाल त्यांनी केला आणि याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. असे उध्दट भाषेत उत्तर देऊन माहीती देण्यास टाळाटाळ केली.
काही ठिकाणी जमीन संपादनाचा विषय होता तो मार्गी लागला आहे. काम प्रगतिपथावर आहे.-संतोष शेलार, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
या महामार्गावरून अनेकदा कामासाठी ये-जा करावी लागते. गेल्या सहा ते सात वर्षांपासून या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी रखडलेले आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.- अमोल आटुळे, वाहनधारक