लॅपटॉपचोरीचे तमिळनाडू कनेक्शन; अख्खा महाराष्ट्र फिरुन त्रिकुटांनी केली चोरी, असा लागला छडा

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : रस्त्यालगत पार्क असलेल्या गाडीच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप चोरणाऱ्या त्रिकुटाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. सेनिथील दुरायरजन कुमार आर. डी (४८), मूर्ती रामासामी चिन्नाप्पन (३०) व शिवा विश्वनाथन (४७) अशी या त्रिकुटाची नावे आहे. हे चोर लॅपटॉप चोरण्यासाठी तमिळनाडू राज्यातील तिर्ची येथून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१० लॅपटॉप जप्त

या चोरांनी नवी मुंबईसह इतर भागांत केलेले सात गुन्हे उघडकीस आले असून वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरलेले १० लॅपटॉप जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली. या चोरांनी १० जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास वाशी सेक्टर-१७मधील विज्ञान सोसायटीसमोरील रोडवर पार्क केलेल्या दोन गाड्यांच्या काचा फोडून दोन्ही गाड्यांमधील दोन ऍपल कंपनीचे लॅपटॉप चोरून पलायन केले होते. त्यानंतर वाशी पोलिसांनी अमेय विचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. त्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलिस ठाण्यातील अभिलेख तपासण्यास सुरुवात केली होती.
RTO निरीक्षकावर झाडली गोळी, उंदीर पायावरुन गेल्याच्या ‘नाट्या’चा पर्दाफाश, तपासात धक्कादायक खुलासा
संपूर्ण महाराष्ट्रात चोरी

या दरम्यान चोरांनी जे लॅपटॉप चोरले होते, त्यातील अमये विचारे यांचा लॅपटॉप त्यांच्या आय फोनशी कनेक्ट असल्याने विचारे यांना त्यांच्या आयफोनवर वारंवार लॅपटॉपचे लोकेशन मिळत होते. यावरून आरोपींचे लोकेशन सीएसएमटी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशीकांत चांदेकर व पोलिस निरीक्षक संजय नाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे, पवन नांद्रे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश बारसे व त्यांच्या पथकाने तत्काळ रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले. यावेळी हे चोर मूळ गावी ट्रेनने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, वाशी पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने लॅपटॉपच्या लोकेशनच्या आधारे तिन्ही चोरांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरलेले १० लॅपटॉप सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेले लॅपटॉप जप्त करून त्यांना अटक केली. चोरांकडे केलेल्या तपासादरम्यान ते तमिळनाडू राज्यातील तिर्ची येथून लॅपटॉप चोरण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्यांनी मागील २० दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून वाशी, नवघर, मुलुंड, सीबीडी, नाशिक, पुणे, पंढरपूर या भागातून गाड्यांच्या काचा फोडून त्यातील १० लॅपटॉप चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी विविध भागांत केलेले सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

Source link

laptop thieflaptop thievesmumbai police newsNavi Mumbai newsnavi mumbai policeलॅपटॉप चोरी
Comments (0)
Add Comment