गोखले पुलाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पालिका अधिकाऱ्यांसह आमदार अमित साटम, पश्चिम रेल्वे, प्रकल्प सल्लागार, तांत्रिक पर्यवेक्षण सल्लागार आणि कंत्राटदार उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांनी संबंधित विभागांना वरील निर्देश दिले. तांत्रिक बाबींमुळे पुलाच्या कामासाठी अतिरिक्त कालावधी लागला असला तरी पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावे, असे चहल म्हणाले.
पुलाचा पहिला गर्डर बसवण्याचे काम २ डिसेंबरच्या मध्यरात्री पूर्ण करण्यात आले. त्यानंतर गर्डर उत्तर दिशेला १३ मीटर समतोल पातळीवर सरकवण्यासह अन्य तांत्रिक कामे १४ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात आली. हे काम अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे होते. गोखले पूल सर्वाधिक उंचीवरून म्हणजे ७.८ मीटरवरून खाली उतरविण्यात येणारा देशातील पहिलाच पूल आहे. या पुलाच्या कामाला वेग देण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
२ डिसेंबरला गर्डर बसवण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वे आणि तांत्रिक सल्लागार यांच्याकडून सर्व चाचण्या, परीक्षण पार पाडल्यानंतरच पूल खाली उतरवण्याचे काम ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आले. खबरदारी घेऊन गर्डरसह अन्य तांत्रिक कामे करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागला आहे. लवकरच हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पालिकेकडून बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सन १९७५मध्ये बांधण्यात आलेल्या गोखले पुलाचा भाग ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे हद्दीतील भाग धोकादायक असल्याच्या तक्रारीमुळे त्याचे काम हाती घेण्यात आले; मात्र ७ नोव्हेंबर २०२२पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुनर्बांधणी महापालिका करत आहे. पूल पुनर्बांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र या कामाला विविध कारणांमुळे विलंब झाला. त्यानंतर १५ फेब्रुवारी किंवा त्यानंतर पुलाचा एक भाग सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन होते. आता २५ फेब्रुवारीपासून एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पूल पुनर्बांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र पूल बांधणीसाठी आवश्यक पोलादाचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन संबंधित पोलाद कारखान्यातून लोखंडी प्लेट्स उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर लोखंडी गर्डर निर्माण करणाऱ्या अंबाला येथील फँब्रिकेशन कारखान्यात अतिवृष्टीमुळे पाणी भरले. त्यामुळे गर्डर निर्माण करण्याच्या कामात सुमारे १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला होता. लोखंडी गर्डरचे सुटे भाग प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामस्थळी आणून जून २०२३ मध्ये गर्डर जुळवणीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे एक मार्गिका सुरू करण्यास विलंब झाला. डिसेंबर २०२३ अखेरीस संपूर्ण पूल खुला व्हावा, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील होती.