पुण्यात रक्ताचा तुटवडा; रक्तपेढ्यांमध्ये काही दिवसांपुरता साठा शिल्लक, नातेवाइकांची धावपळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात करोनासह सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली असतानाच आता रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये अवघे काही दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. परिणामी, रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठ्या रक्तदान शिबिरांचे आयोजन न झाल्यास सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच रक्ताअभावी नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते. यामुळे रक्तपेढ्या आगामी दोन ते तीन दिवसांमध्ये मोठ्या शिबिरांचे आयोजन करण्याची तयारी करीत आहे.

डिसेंबरमधील सुट्यांमुळे शिबिरांची संख्या घटल्याने तुटवडा निर्माण झाल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे. तर शहरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांमधून मोठ्या प्रमाणावर रक्ताचा साठा होतो. मात्र, तरी देखील वारंवार शहरात रक्ताचा तुटवडा कसा निर्माण होतो असा प्रश्न रक्तदानासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी उपस्थित केला आहे. रक्ताच्या तुवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरजही सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे. शहरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने उपचारांसाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर रक्ताची मागणी असते.

‘ससून’मध्ये एक दिवसाचा साठा

ससून रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सद्यस्थितीत पुढील एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. दिवसाला सरासरी ६० ते ७० पिशव्यांची मागणी आहे. त्यामुळे बाहेरील रक्तपेढ्यांमधून रक्त आणून रुग्णांना द्यावे लागत आहे. वर्षाला २४ हजार पिशव्यांची गरज असते. मात्र, प्रत्यक्षात १८ हजार पिशव्यांचे संकलन होते. त्यामुळे वर्षातून काही वेळा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.
‘अँटिबायोटिक्स’चा अतिवापर टाळा, करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सच्या सूचना
‘सद्यस्थितीत ‘ओ’ रक्तगट वळता अन्य सर्व रक्तगटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. यामधून रक्तसाठा उपलब्ध होणार आहे.- डॉ. सोमनाथ खेडकर, ससून रक्तपेढी

‘शहरातील सरकारी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर शिबिरांचे आयोजन केले जाते. शिबिरांमधून गोळा झालेले रक्त परराज्यातही पाठवले जाते, यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे’.- राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्ट

‘डिसेंबरमध्ये शिबिरांची संख्या घटल्याने सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याने काही दिवसातच तुटवडा दूर होणार आहे. सध्या मागणीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे’.- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

Source link

blood bank in puneblood donationblood shortageblood shortage in maharashtraBlood Shortage In Puneपुणे महानगर पालिकापुण्यात रक्ताचा तुटवडा
Comments (0)
Add Comment