तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी लवकरच, २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे मिळण्याची शक्यता

पुणे : तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आता येत्या आठवड्यात जिल्हानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे. जात संवर्गनिहाय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २६ जानेवारीला ही नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच भूमीअभिलेख विभागाने जाहीर केली. त्यावर परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला होता. दरम्यान, भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. ते काम अंतिम टप्प्यात आहे. आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येतील, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातून तलाठी परीक्षेसाठी सुमारे आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत. अर्जदारांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आल्या. दिवसातील तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सहा जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

‘निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेण्यात येते. या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे. ही रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे. या याद्या २३ जिल्ह्यातील असून ते तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवडाभरात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरावर जाहीर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. दरम्यान, यशस्वी उमेदवारांना येत्या २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे देण्याचे नियोजन सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तलाठी परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात ही यादी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे- सरिता नरके, राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त

Source link

maharashtra talathi bharatimaharashtra talathi bharati 2023talathi bharatitalathi bharati appointment letterstalathi bharati resultsतलाठी भरतीतलाठी भरती निकालमहाराष्ट्र तलाठी भरतीमहाराष्ट्र तलाठी भरती २०२३
Comments (0)
Add Comment