हायलाइट्स:
- नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार
- नदीकाठील प्रमुख स्मशानभूमी पाण्याखाली
- गावांना धोका
नांदेड : राज्यात सध्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले ओसांडून भरले असून अनेक गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. नांदेडमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
शहरातील गोदावरी नदीकाठावर असलेली प्रमुख स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सकाळी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गोवर्धनघाट स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सिडको इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली.
नांदेडमध्ये सखल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सकाळी साडे आठ वाजता उसंत दिली आहे. त्यामुळे आता पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. या कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव उत्तर कोकणात असेल. मुंबई, पालघर, ठाणे येथे बुधवारी अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघरमध्ये गुरुवारीही याचा प्रभाव जाणवू शकेल. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या पट्ट्यात गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तसेच पालघर येथे शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असेल. मात्र उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणताही इशारा नाही. बहुतांश ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. गुजरातमध्ये ८ आणि ९ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस असल्याने राज्यातील लगतच्या जिल्ह्यांवर काही प्रमाणात प्रभाव असू शकेल.