कचऱ्याचे ढीग, काळेशार पाणी; हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत परिसरातील नागरिक संतप्त

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल-सावंगीचे ‘नारेगाव’ करू नका. आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या अशा भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. सावंगी तलावाच्या पायथ्याशी पालिकेने उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे पाच किलोमीटरच्या परिघात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे प्रदूषण वाढले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात २०१७ मध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १४७ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले. या पॅकेजमधून शहराच्या चार दिशांना प्रत्येकी एक या प्रमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी या भागात प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. हर्सूल-सावंगी येथे प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती, पण जागेच्या उपलब्धतेअभावी प्रकल्प उभारणीचे काम रखडले. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकल्प सुरू झाल्यावर साडेतीन महिन्यात या प्रकल्पाबद्दल नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून दररोज सुमारे १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित असताना कमी प्रमाणात कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या परिसरात साचलेल्या कचऱ्याचे ढीग दिसून येतात. साचलेल्या कचऱ्यावर लगेचच प्रक्रिया होत नसल्यामुळे त्यापासून दुर्गंधी निर्माण होत आहे, कचऱ्यापासून निघणाऱ्या लिचटमुळे आजूबाजूच्या शेत जमिनी धोक्यात आल्या आहेत. काही शेतांमधील विहिरींचे पाणी काळे पडले असून त्याचा पिकांवर देखील परिणाम होऊ लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा परिघ पाच किलोमीटरचा असल्याचे सांगितले जाते. हर्सूल-सावंगी येथील प्रकल्पाच्या आवारातील कचऱ्याची दुर्गंधी मयूरपार्क, जाधववाडी, टीव्ही सेंटर पर्यंत येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतो. वाऱ्याची दिशा जशी असेल तशी दुर्गंधी पसरते, त्यामुळे सकाळचा चहा घेणे, रात्रीचे जेवण करणे नागरिकांना अशक्य होऊन बसले आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महापालिकेने काहीही उपाययोजना केलेली नाही अशी तक्रार नागरिक करीत आहेत. कचराडेपोमुळे नारेगाव आणि परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. आता हर्सूल-सावंगीचे नागरिक त्रस्त झाले आहेत. आमचे ‘नारेगाव’ करू नका अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र-तेलंगण व्यवहार ठप्प; मेडीगड्डाचा पूल खचल्याने सीमेवरील गेटला कुलूप
हर्सूल नाका या ठिकाणी महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे मयूर पार्क-जाधववाडीपर्यंत दुर्गंधी पसरली आहे. लिचटचा त्रास वाढला आहे, त्यामुळे शेतजमिनी धोक्यात आल्या आहेत. शेतांमधील विहिरींचे पाणी दूषित होऊ लागले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचा पर्यटकांवरदेखील परिणाम होईल. या प्रकल्पाची जागा बदलण्यात यावी.-मनोज गायके, नागरिक

सावंगी तलावाच्या पायथ्याशी कचरा प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हा तलाव पाझर तलाव आहे. तलावातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतींमधील विहिरी भरतात, पिकांना त्याचा लाभ होतो. कचऱ्यापासून निघणाऱ्या लिचटमुळे तलावाचे आणि विहिरींचे पाणी दूषित होत आहे. दुर्गंधीचा मोठा त्रास होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी आजार होऊ लागले आहेत. अनेक नागरिकांनी मॉर्निंग वॉक बंद केले आहे. महापालिकेने प्रक्रिया प्रकल्प बंद करुन वॉर्डावॉर्डांत प्रकल्प उभारावेत.-नारायण सुरे, नागरिक

कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे पाच किलोमीटरच्या परिघात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या प्रकल्पामुळे सावंगी तलावाचे पाणी दुषित होऊ लागले आहे. सावंगी-पिसादेवी-जाधववाडी-टीव्ही सेंटरपर्यंत दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. महापालिकेने प्रक्रिया प्रकल्पाची जागा बदलावी.-गोरख औताडे, नागरिक

कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून हर्सूल-सावंगीचे ‘नारेगाव’ करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. प्रसंगी आंदोलन करू, उपोषण करू. दुर्गंधीमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही. नाकाला सतत रुमाल बांधावा लागतो. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे पालिकेने लवकरात लवकर स्थलांतर करावे.-योगेश औताडे, नागरिक

दुर्गंधीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुर्गंधीचा त्रास इतका आहे की घरात बसून नीट जेवणदेखील आपण करु शकत नाही. कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावरुन फिरतात. कचरा प्रक्रिया प्रकल्प नागरी वस्तीपासून लांब असला पाहिजे.-सोमनाथ राठोड, नागरिक

Source link

chhatrapati sambhajinagar municipalitychhatrapati sambhajinagar newsharsul garbage projectharsul newsछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर बातम्या
Comments (0)
Add Comment