हायलाइट्स:
- बेळगावच्या निकालावरून भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक
- एकीकरण समितीविरोधात कटकारस्थान झाल्याचा संजय राऊत यांचा दावा
- माजी खासदार नीलेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका
मुंबई: बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बाजी मारली असून निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. तर, सत्ताधारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. भाजपच्या दणदणीत विजयामुळं खूश झालेल्या राज्यातील भाजप नेत्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे.
सीमा भागांतील मराठी भाषिकांसाठी बेळगाव महापालिकेची निवडणूक अनेकार्थांनी महत्त्वाची असते. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचंही या निवडणुकीकडं बारकाईनं लक्ष असतं. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनाही तिथं निवडणुका लढत असते. बेळगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं उमेदवार उभा केला होता. महापालिका निवडणुकीत मात्र शिवसेना स्वत:च्या पक्षचिन्हावर लढली नव्हती. त्याऐवजी शिवसेनेनं महाराष्ट्र एकीकरण समितीला साथ दिली होती. बेळगावात मराठी माणसाचा भगवा ध्वज फडकेल, असा दावाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. मात्र, समितीला अपेक्षित यश मिळालं नाही. या निकालावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे. ‘एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी यंदा किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. याबाबतची माहिती पुढील काळात समोर येईलच,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: पुणे हादरले! १४ वर्षीय मुलीवर आठ जणांचा सामूहिक बलात्कार
या पार्श्वभूमीवर माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत व शिवसेनेला चिमटा काढला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. बेळगाव महापालिकेत प्रत्येक पक्षानं जिंकलेल्या जागांची आकडेवारीच त्यांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला व संजय राऊत यांना टोला हाणला आहे. संजय राऊत आणि शिवसेना पुन्हा तोंडावर पडले. तुमची पात्रता काय आणि बोलता किती?,’ असा खोचक सवालही नीलेश राणे यांनी केला आहे.
वाचा: अनिल देशमुख यांच्या ठावठिकाण्याबाबत माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा