पुण्यातील एका महिला पोलिस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप जुलै २०२१ मध्ये व्हायरल झाली होती. त्यामध्ये संबंधित अधिकारी महिलेने अधिकार क्षेत्रातील पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील एका हॉटेलमधून मटण बिर्याणी आणण्यास सांगितले होते. त्या बिर्याणीसाठी पैसे देण्याची गरज नाही, हे सांगताना ‘आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे देण्याची गरज काय?’ असे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला विचारल्याचे क्लिपमध्ये ऐकू येत होते. ती क्लिप व्हायरल झाली होती. त्याची चौकशी करण्याचा आदेश तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला होता. दरम्यान, ‘ऑडिओ क्लिप’ षडयंत्र असल्याचा आरोप करून, ती क्लिप आपली नसल्याचा दावा महिला अधिकाऱ्याने केला होता.
शिक्षा सुनावण्यात आलेला कर्मचारी घटना घडली त्यावेळी पोलिस उपायुक्त कार्यालयात नेमणुकीस होता. तर, सध्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-२ येथे कार्यरत आहे. त्या कर्मचाऱ्याची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली होती. त्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. पोलिस मुख्यालयातील उपायुक्त रोहिदास पवार यांनी कारवाईचा आदेश काढला. दरम्यान, कर्मचाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे कर्मचारी वर्गात नाराजी आहे.
उपायुक्तांच्या आदेशातील शेरे
– चार डिसेंबर २०२० या दिवशी जेवणाची ऑर्डर देण्याबाबत झालेले संभाषण मोबाइलमध्ये जतन करून ठेवले.
– जतन करून ठेवलेले संभाषणाची क्लिप २९ जुलै २०२१ या दिवशी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली.
– वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेले संभाषण हेतूपुरस्सर रेकॉर्डिंग केले व बदनामीसाठी प्रसारित केले.