हायलाइट्स:
- तुम्ही स्वत: पाहा पावसाचं रौद्ररूप
- पाण्याच्या प्रवाहात वाऱ्यासारखी वाहिली कार
- नदीकाठावर असलेली प्रमुख स्मशानभूमी पाण्याखाली
नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास मुखेड तालुक्यात मोती नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. कारमध्ये तीन व्यक्ती होते त्या पैकी दोन व्यक्ती कारसह वाहून गेले आणि एका व्यक्तीने झाडाचा आधार घेत स्वतःचा जिव वाचवला या व्यक्तीला वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कार बेपत्ता झाली असून कार आणि कारमधील व्यक्तींचा शोध घेण्याच काम सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाला मदत पुरविण्यास अडचणी येत आहेत. शहरातील गोदावरी नदीकाठावर असलेली प्रमुख स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सकाळी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गोवर्धनघाट स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सिडको इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली.
नांदेडमध्ये सखल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सकाळी साडे आठ वाजता उसंत दिली आहे. त्यामुळे आता पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.