आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अजून अडीच महिने शिल्लक आहे. मात्र, त्यापूर्वीच मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे भंगार विक्रीचे लक्ष्य पार केले आहे. असे करणारी पहिली क्षेत्रिय रेल्वे होण्याचा टप्पा मध्य रेल्वेने गाठला आहे.
मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून ३००.४३ कोटी मिळवले. एप्रिल ते डिसेंबर-२०२३ या काळातील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा ३२.२३ टक्के वाढ झाली आहे, जी सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये सर्वाधिक ठरली आहे.
मध्य रेल्वेने प्राधान्य देत जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले जुने रूळ व जुने आणि अपघाती इंजिन/डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार साहित्य ओळखून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शून्य भंगार मोहिमेंतर्गत अशी कार्यवाही करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील सर्व विभाग, कार्यशाळा आणि शेड यांच्या एकत्रित प्रयत्नांचे शून्य भंगार मोहीम राबविण्यात आली. त्यांनी भंगार साहित्य दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.
– रेल्वेचे एकूण २२,३४३ मेट्रिक टन भंगार
– २३ इंजिनांसह २५२ डब्यांचा समावेश
– १४४ मालवाहू वॅगन्सचाही यात सहभाग
– भुसावळ विभागातील १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज रूळ
विभागनिहाय कमाई (रक्कम कोटी रुपयांमध्ये)
– भुसावळ – – – – – ५९.१४
– माटुंगा – – – – – – – – ४७.४०
– मुंबई – – – – – – – – ४२.११
– पुणे – – – – – – – – – ३२.५१
– भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड- – – – – २७.२३
– सोलापूर – – – – – – – – – – २६.७३
– नागपूर – – – – – – – – – – – २४.९२
– इतर ठिकाणी एकत्रित – – – – – ४०.३९