मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक मुंबईला निघणार आहेत. जरांगे यांनी नुकताच गोदापट्ट्यातील १२३ गावांचा दौरा पूर्ण केला आहे. या गावांमधून जरांगे यांना मोठा पाठिंबा मिळाला असून, आंदोलकांनी मुंबईला जाण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. गावोगावी पूर्वनियोजनासाठी बैठका पार पडल्या आहेत. गावातून कितीजण मुंबईला जातील याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, अभिजीत देशमुख, सतीश वेताळ, रमेश गायकवाड, आत्माराम शिंदे, निवृत्ती डक, दिनेश शिंदे, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे, तनश्री गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातून शेकडो वाहनांनी आंदोलक साधनसामुग्रीसह सहभागी होणार आहेत. दैनंदिन वापरातील साहित्य, भोजनाचे साहित्य व रात्री निवासासाठीच्या सामान आंदोलक सोबत घेणार आहेत. प्रथमोपचाराचे साहित्य आणि छत्रपती संभाजीनगर येथून स्वतंत्र रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक घेऊन आंदोलक सहभागी होणार आहेत, अशी माहिती समन्वयक सुरेश वाकडे यांनी दिली. महिला व वयोवृद्धांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, अंतरवाली ते मुंबई हे अंतर पायी आणि वाहनांनी पार केले जाणार आहे. मुंबईपर्यंत लाखो लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गर्दी वाढणार असल्यामुळे वाहनांना स्वतंत्र क्रमांक दिले आहेत. त्या वाहनात आलेल्या आंदोलकांना आपले वाहन शोधणे सोपे होणार आहे, असे समन्वयकांनी स्पष्ट केले. ज्या मार्गाने आंदोलक जातील, त्या मार्गावरील शेतमाल किंवा मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही सकल मराठा समाजाने केली आहे.
घराघरातून शिदोरी देणार
दररोज सकाळी तीन तास आंदोलक पायी चालणार आहेत. त्यानंतर वाहनाने पुढील मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. स्थानिकांनी जेवणाची व निवासाची व्यवस्था केली आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी इतरांवर अवलंबून न राहता स्वयंपाकाचे साहित्यही सोबत घेण्यात आले आहे. शिवाय, घरातून शिदोरी मागण्यात आली आहे. एका शिदोरीत चार भाकरी, कोरडी भाजी आणि लिंबू सरबत देण्याचे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले आहे.
शिवरायांचा पुतळा
अंतरवाली ते मुंबईपर्यंत आंदोलनाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा असणार आहे. हा पुतळा खुलताबाद येथील शिल्पकार नरेंद्रसिंग साळुंखे यांनी तयार केला आहे. राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने घडवलेला हा बारा फुटी पुतळा छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी सायंकाळी अंतरवाली सराटीकडे पाठविण्यात आला.