हायलाइट्स:
- रत्नागिरी- संगमेश्वरमधील गड नदीला पूर
- बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत
- ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी : सततच्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. गड नदीचे पाणी माखजन बाजारपेठत शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माखजन बाजारपेठत चार ते पाच फूट पाणी साचले असून दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आता हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे. संगमेश्वर तालुक्यात देखील पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरूवात केली असून त्यामुळे गडनदीला पूर आला आहे. परिणामी आता माखजन बाजारपेठेत पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. कळंबुशी येथे देखील पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
रत्नागिरीत कालपासून कोसळणाऱ्या पावसानं हाहाकार माजवला आहे. खेड, दापोलीत पावसानं विश्रांती घेतली असली तरी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस आहे. कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं शहरातील वशिष्ठी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे. मात्र, परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. मात्र, सोमवारपासून पावसाची संततधार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २२ जुलै रोजी आलेल्या महापूराने गटारात आलेली माती व काही ठिकाणी चोकअप झालेल्या ड्रेनेजमुळे हे पाणी लवकर रस्त्यावर येण्याचा धोका आहे.
चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनामधील तीन बोटी शहरात तैनात केल्या आहेत. येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसंच, शहरांमध्ये पुन्हा पाणी भरण्याच्या भीतीने चिपळूणच्या व्यापाऱ्यांनी काल रात्रीपासूनच दुकानातील सामान उंचीवर ठेवायला सुरूवात केली आहे.
शहरातील शिव नदीपात्रामध्ये साडेचार मीटर इतकी उंची नोंदवण्यात आले. रात्री उशिरा ही नदी ओव्हरफ्लो झाली होती मात्र आत्ता ओहोटी असल्याने पाण्याची पातळी कमी आहे. सध्या शहरातील मार्कंडी येथील सखल भागात, टिळक वाचनालय रस्ता येथील रस्त्यावर पाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.