२२ जानेवारीला राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. २२ जानेवारी रोजी पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेत्यांनी सरकारकडे यासंदर्भात मागणी केली होती.
याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने याबद्दलचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना, २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था, कार्यालयांमध्ये दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अधिकाधिक लोकांना पाहता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लांची मूर्ती आसनावर स्थानापन्न करण्यात आली. आता या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ५१ इंच उंची असलेली प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News