महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी मिळेल. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथून खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव हेच राहणार आहे.
भाजपकडून बोर्डीकर यांनी दंड थोपटले
महायुतीच्या वतीने सध्या तरी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांकडूनही आपली दावेदारी घोषित केली आहे. भाजपकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांची मुलगी मेघना बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना मानणारा परभणी जिल्ह्यामध्ये मोठा वर्ग आहे. सध्या सोशल मीडिया वरून रामप्रसाद बोर्डीकर भावी खासदार असे बॅनरही आता फिरू लागले आहेत.
दादा गटाकडून राजेश विटेकर इच्छुक
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांचे नाव आघाडीवर आहे. राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांचा पन्नास हजार मताने पराभव झाला होता. राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. २०१९ पासून ते परभणी लोकसभा मतदारसंघात आपला संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीची जागा राष्ट्रवादीला सुटावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
शिंदेंकडून अर्जुन खोतकर यांची चर्चा
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा असल्याचे समजते. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा आणि धनुष्यबाणाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी लोकसभेची जागा आपल्याकडेच ठेवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी चांगलेच लक्ष घातले आहे. परभणी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नगरसेवक माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माजी आमदार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तरी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर आहे पण ऐनवेळी मुख्यमंत्री एखाद्या बड्या नेत्यास शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा आहे.
महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही. पण तीनही पक्ष आपला उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने लोकसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करत आहेत. लवकरच परभणी लोकसभा कोणता पक्ष लढविणार, याचा निर्णय होईल, असे महायुतीतील पक्षांनी सांगितलं. पण सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचाच दावा प्रबळ असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना धनुष्यबाण आणि परभणी जिल्हा याचे अतूट नाते
मुळातच परभणी जिल्हा हा मागील ३० वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. १९९१ पासून आतापर्यंत परभणी जिल्ह्यात शिवसेनेचाच खासदार निवडून येत आहे. परभणी जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि तेवढेच प्रेम उद्धव ठाकरे यांच्यावरही करणारा वर्ग आहे. त्यामुळेच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत परभणी जिल्ह्यातील खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील कोणीही सोबत गेले नाही.
शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह परभणी लोकसभा मतदारसंघामुळे मिळाले आहे. धनुष्यबाणावर पहिला खासदार परभणीतून निवडून आला आहे. पण या वेळेस चिन्ह आणि पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने परभणीकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतात की एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
२०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार संजय जाधव यांना ५ लाख ३८ हजार ९४१ मते पडली. ज्याची टक्केवारी ४३ टक्के आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ मते पडली. ज्याची टक्केवारी ४० टक्के होती. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कडून आलमगीर खान यांनी दीड लाख मते घेतली. ज्याची टक्केवारी १२ टक्के होती. वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मते घेतल्यामुळे मागील वेळेस राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेते यावरही बरेच काही अवलंबून आहे.
विधानसभानिहाय आमदार
परभणी लोकसभा मतदार संघामध्ये परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा तर जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत तर जालन्यातील परतुर आणि घनसांगवी हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात.
१) परभणी विधानसभा- आमदार डॉ. राहुल पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
२) जिंतूर विधानसभा-मेघना बोर्डीकर (भाजपा)
३) गंगाखेड विधानसभा- आमदार रत्नाकर गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष)
४) पाथरी विधानसभा – आमदार सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
५) परतूर विधानसभा – आमदार बबनराव लोणीकर (भाजपा)
६) घनसांगवी विधानसभा – आमदार राजेश टोपे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
महाविकास आघाडी आणि महायुतीचे बलाबल पाहिले असता महाविकास आघाडीकडे तीन विधानसभा आणि महायुतीकडे तीन विधानसभा असे चित्र आहे.