आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना शंकरशेट यांनी निस्वार्थ बुद्धीने आपले तन-मन धन खर्च करून लोकहिताच्या चळवळी उभारून गतिमान केल्या. नाना शंकरशेट यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज आमदानीत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय चळवळीचा पाया घातला आणि त्याचे मूर्त स्वरूप म्हणून ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई विद्यापीठ, विधी महाविद्यालय, जे. जे. हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, सद्यस्थितील राणीचा बाग, डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, रॉयल एशियाटिक सोसायटी या सह मुंबईतील पहिली रेल्वे, डॉक्टर विल्सन यांच्या सहकार्याने मुंबईत सुरु केलेली पहिली मुलींची शाळा या प्रमुख संस्थांचा उल्लेख होत असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. नाना शंकरशेट यांची ओळख ही मुंबई शहराचे शिल्पकार म्हणून आहे. लेखक अमर शेंडे यांनी लिहिलेले चरित्र म्हणजे एका परिने मुंबई शहराचा शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय इतिहास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नानांच्या या चरित्रामुळे त्यांनी केलेल्या त्यांनी केलेल्या अजोड कार्याची स्फूर्ती महाराष्ट्राच्या आजचा व भावी पिढ्यांना चैतन्यशील व प्रेरणादायी ठरेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा भारतीय संस्कृती आणि परंपरेला साजेसा दीक्षान्त समारंभाचा पोशाख बदलला तेव्हा विद्वतेचे प्रतिक म्हणून नाना शंकरशेट पगडीचा स्विकार केला आणि याबदलाचे अनेकांनी स्वागत केले असल्याचे त्यांनी सांगितले. नाना शंकरशेट यांनी सामाजिक सुधारणा, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात बहुआयामी योगदान दिले. मुंबई विद्यापीठाच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन विद्यापीठातील विविध विभागामार्फत त्यांच्या योगदानावर आणि कार्यावर संशोधन करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि नाना शंकरशेठ यांनी एकत्रित केलेल्या समाजोपयोगी कार्यावर प्रकाश टाकुन, मुंबई विद्यापीठाने या दोघांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करून त्यांची स्मृती जतन करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरेंद्र शंकरशेट यांनी नानांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. चरित्र लेखक अमर शेंडे यांनी, चरित्र निर्मितीसाठी रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रोत्साहन दिले. लेखनासाठी साहित्य व संस्कृती मंडळ आणि अनेक नाना प्रेमींचे सहकार्य लाभले असे सांगून नानांचे मुंबईत यथोचित स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार रोहित वाकडे यांनी केले तर आभार मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी मानले.