मोल्ला मुस्ताक मोजहार (४०, रा.कोसाड गुतल, सुरत, गुजरात, ह.मु. कोवेगांव उर्दु शाळेजवळ, खारगर, नवी मुंबई) आणि उज्जल चित्तरंजन पत्रा (३३, रा. आगासान रोड, गणेशनगर दिवा (ईस्ट) ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी मोल्ला बांग्लादेश येथील रहिवासी आहे. याशिवाय शेख बाबू दाऊद शेख (४०, रा. शिवाजीनगर डेपो, मुंबई, मूळ रा.बांग्लादेश) आणि समशेर (रा. डोंगरी मुंबई, मूळ पत्ता किसनगंज बिहार) हे फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारीला बजरंगनगर येथील सिद्धेश्वर सभागृहाजवळ राहणारे सुनील विनायक तिमांडे (६३) यांच्या घरात चोरट्यांनी शिरून ९९ तोळे सोने आणि रोख रक्कम माल चोरून नेल्याची तक्रार अंजनी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्याचा समांतर तपास करत असताना पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) मुमक्का सुदर्शन सहायक पोलीस आयुक्त श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून मोल्ला नावाचा व्यक्ती साथीदारांसह चोऱ्या करत असल्याची बाब समोर आली.
तो मुंबईला असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. तपासात तो बांग्लादेशी असल्याची माहिती समोर आली. तो साथीदार शेख बाबू दाऊद हे दोघेरी सहा ते सात महिन्यांपूर्वी अवैधरीत्या देशात दाखल झाल्याची माहिती पथकाला मिळाली. अगोदर गुजरात आणि त्यानंतर ते दोघेही मुंबईमध्ये स्थायिक झाले. त्यांच्यासोबत उज्ज्वल आणि समशेर यांनी एकत्र येत घरफोडी करण्याचे सत्र सुरू केले. त्यातूनच ते नागपुरात येऊन घरफोडी केल्याची बाब तपासात उघडकीस आली. शेख बाबू हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे कळते.