कोणताही महोत्सव यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यकता असते. एका राज्याची संस्कृती दुसऱ्या राज्याला माहित व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी असा त्यामागील उद्देश असतो; मात्र युवा महोत्सव घेताना अशी पूर्वतयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आले नाही. ऐनवेळी स्थानिक अधिकाऱ्यांकडे जबाबदारी ढकलून वरिष्ठ मोकळे झाले. ‘महोत्सव यशस्वी झाला तर आम्ही केला, अपयश आले तर स्थानिक अधिकाऱ्यांमुळे’, असे म्हणण्यासाठी ते तयार होते. महोत्सवामुळे नाशिकला ना काम मिळाले, ना विचार, सांस्कृतिक देवाणघेवाण झाली नाही. त्यामुळे हा महोत्सव केवळ ‘झाला’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याबाबत काही नाशिककरांनी आपल्या भावना व्यक्त केला आहेत.
विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक बाहेरून गाड्या मागवण्यात आल्या. हॉटेल बुकिंग मिळाले नाही. एवढा मोठा इव्हेंट होत असताना स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना बरोबर घेतले असते तर परराज्यांमधील तरुणांना नाशिकची चांगली माहिती मिळू शकली असती. यातून नाशिकचे पर्यटन वाढण्यास मदत झाली असती. मात्र असे काही झाले नाही.- अमोल जोशी, पर्यटन व्यावसायिक
राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र, नाशिककर त्याचा आस्वाद घेण्यास अपुरे पडले. देशातील विविध प्रांतातून आलेल्या तरुणांनी त्यांच्या प्रांतातील लोकसंस्कृती, लोकसंगीत, लोककला सादर केली. शिवाय त्या-त्या प्रांतातील विशिष्ट खाद्यपदार्थ, विविध कलाकारी असलेल्या वस्त्रांचे प्रदर्शन देखील केले होते. तेथे नाशिककर फिरकले नाही.- अविनाश खैरनार, छत्रपती पुरस्कार विजेते.
युवा महोत्सव नाशिकमध्ये होणार असल्याने शहराला खूप काही मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र तसे काहीही झाले नाही. व्यावसायिक दृष्ट्यादेखील फार संधी उपलब्ध झाल्या नाहीत. नाशिककर देखील महोत्सवाकडे फरकले नाही. अशा प्रसंगी पक्षाचे जोडे बाजुला सारून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे होते. ती उणीव भासली. भविष्यात अशी खंत राहणार नाही, अशी अपेक्षा आहे.- अर्जुन टिळे, क्रीडा संघटक
युवा महोत्सवामुळे शहरात रस्ते दुरुस्ती आणि रंगरंगोटी झाली, एवढाच काय तो एकच फायदा झाला. विभागीय क्रीडा संकुलात अनेक कामे प्रलंबित होती, ती झाली. युवा महोत्सवासाठी दिल्ली आणि पुणे शहरातील अनेकांना कंत्राट देण्यात आले. नाशिकमध्ये यापासून कोणतीही रोजगार निर्मिती झाली नाही. महोत्सवासाठीचे संवयंसेवक सुद्धा परराज्यातून आणले गेले होते.- पवन खाडे, क्रीडा प्रशिक्षक
शहरात लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. याची प्रसिद्धी चांगली केली असती तर आमच्यासारखे विद्यार्थी हजर राहू शकले असते. आदल्या दिवशीपर्यंत आयोजकांनी वेळापत्रक तयार केले नव्हते. साहसी क्रीडा स्पर्धांसाठी प्रथम ठक्कर डोम, चापरलेणी व अंजनेरी अशी स्थळे देण्यात आली होती. प्रत्यक्षात त्या ठिकाणी इव्हेंट झालेच नाही. महोत्सव उरकायचा म्हणून उरकला आहे.- श्रेयस कुलकर्णी, विद्यार्थी
कालिदास कलामंदिरात छायाचित्रण स्पर्धा पाहायला गेलो, तर ती स्पर्धा पुढे ढकलली असे सांगण्यात आले. पुढे कधी होईल विचारले तर सांगता येणार नाही, असे मोघम उत्तर मिळाले. राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्यांकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते. अगोदर प्रसिद्धी झाली असती तर नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला असता.- राजा पाटेकर, रसिक