रस्ता खोदायचाय? मग दुरुस्तीही करा; जाणून घ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : भूमिगत सेवा वाहिन्यांसह विविध कामांसाठी शहराच्या विविध भागांतील रस्त्यांची महापालिका किंवा खासगी संस्थांमार्फत खोदाई केली जाते. कोणत्याही विभागाने खोदाई केली तरी आत्तापर्यंत स्थापत्य विभागामार्फत या रस्त्यांची दुरुस्ती केली जात होती. मात्र, आता खोदकाम करणाऱ्या विभागानेच रस्ते दुरुस्त करून घ्यावेत, असे नवीन धोरण महापालिकेने स्वीकारले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये डांबरी, काँक्रिट, डब्लूएमएम पद्धतीने विकसित केलेले सुमारे १३७५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. स्थापत्य विभागामार्फत खोदलेले चर बुजविण्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्धीचा विषय महापालिकेच्या निविदा समितीमध्ये सादर केला होता. ज्या विभागाने रस्ते खोदाई केलेली आहे, त्याच विभागामार्फत खोदलेले चर बुजविण्यात यावेत, अशा निविदा समिती सदस्यांनी सुचना केल्या.

शहरातील बहुतांश रस्ते सुस्थितित आहेत. महापालिका तसेच खाजगी संस्थामार्फत भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी खोदकाम केले जाते. स्त्याच्या कामांचा सुमार दर्जा व तत्सम कारणांमुळे शहरातील रस्ते पावसाळा आणि इतरवेळीही खड्डे पडतात. खड्ड्यांबाबत नागरिकांकडून अनेकदा तक्रारीही येतात. त्यानुसार महापालिकेच्या वतीने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असते. रस्ते खोदाई महापालिकेमार्फत व बाह्य एजन्सीमार्फत केली जाते. महापालिकेमार्फत खोदाई करण्यात येत असल्यास संबंधित विभागामार्फत त्वरित रस्ते दुरूस्ती करता येते. स्थापत्य विभागाच्या समन्वयाने ही कामे करावीत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

महत्त्वाची बातमी! पाणी असेल, तरच बांधकाम; PMRDA हद्दीबाबत विभागीय आयुक्तांचे आदेश
खड्डे पडल्यास ठेकेदार काळ्या यादीत…

रस्ते खोदाईसाठी बाह्य एजन्सींना स्थापत्य विभागामार्फत परवानगी देण्यात येते. ही परवानगी देताना रस्ता पूर्ववत करण्याची अट टाकूनच परवानगी द्यावी. महापालिकेमार्फत खोदाई केलेले खड्डे, चर बुजविण्याचे काम त्या विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची राहील. हे काम करून घेण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्यावर असणार आहे. तसेच बुजविलेल्या खड्डे पुन्हा ना दुरुस्त झाल्यास याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी त्या-त्या कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्यांची राहणार आहे. यापुढे रस्ते, खड्ड्यांची दुरुस्तीची तीन वर्षांची जबाबदारी राहील, अशी अट निविदेमध्येच नमूद करावी. यापुढे महापालिकेमार्फत रस्त्यांची खोदाई करताना संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करावा. कामाचा हमी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रस्त्यांवर खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे काम कार्यकारी अभियंता यांनी करावी, अशा सूचनाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

——

शहरात कोणत्याही विभागाने रस्ते खोदाई केली की यापूर्वी स्थापत्य विभागामार्फत त्याची दुरुस्ती केली जात असे. आता ज्या विभागाने खोदाई केली त्याच विभागाने रस्ते दुरुस्ती अथवा खड्डे बुजवायचे, असे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

– मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

Source link

Pimpri Chinchwad Municipal Corporationpimpri chinchwad newsunderground serviceनवीन धोरणपिंपरी-चिंचवड महापालिका
Comments (0)
Add Comment