पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) येथील उन्नत मेट्रो स्थानकावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे तीन वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचले. फलाट क्रमांक दोनवर खेळताना तीन वर्षांचा मुलगा अचानक मेट्रोच्या रूळावर पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची आईदेखील रुळावर पडली. या वेळी मेट्रो स्थानकापासून अवघी ३० मीटर अंतरावर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबवण्यासाठीचे बटन दाबले. त्यामुळे मेट्रो वेळेत थांबली आणि दोघांचा जीव वाचला.
सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो स्थानकावर दुपारी अडीचच्या सुमारास तीन वर्षांचा मुलगा फलाट क्रमांक दोनवर खेळत होता. पाहता पाहता तो अचानक तोल जाऊन रुळावर पडला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याची आईदेखील रुळावर पडली. हा सर्व प्रकार सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी पाहिला. त्यांनी तत्काळ फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबवण्याचे बटन दाबले. त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी येणाऱ्या मेट्रो जागेवरच थांबल्या. या वेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतकेच होते. मेट्रो थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले. सुरक्षारक्षक विकास बांगर यांची दाखविलेली समयसूचकता आणि धाडसी कार्याबद्दल ‘महामेट्रो’तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुलगा व त्याची आई रुबी हॉलच्या दिशेने जाण्यासाठी मेट्रोची वाट पाहत होते. त्या वेळी अचानक ही घटना घडली. सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांतर्फे कर्मचाऱ्याचे कौतुक करण्यात आले आहे. फलाटावर थांबले असता प्रवाशांनी लहान मुलांची काळजी घ्यावी.
– हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक (जनसंपर्क), महामेट्रो
सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानकावर दुपारी अडीचच्या दरम्यान एक लहान मुलगा खेळत-खेळत रुळावर पडला. त्या वेळी काही प्रवासी त्याला वर काढण्याचा प्रयत्न करीत होते; पण दोन्ही बाजूने मेट्रो येत असल्याने तातडीने आपत्कालीन बटन दाबले. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मेट्रो थांबल्या.
– विकास बांगर, सुरक्षारक्षक, सिव्हिल कोर्ट स्थानक