मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत आंदोलन करत होते. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगेंनी घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. मनोज जरांगे यांच्या तीन मुली, मुलगा आणि पत्नी यावेळी त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मनोज जरांगे यांंचं कुटुंब भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे आणि त्यांचे कुटुंबीय टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
मला लहान मुलीनं सांगितलं की २६ जानेवारीला कार्यक्रम आहे. विजय घेऊन शाळेत या, माझं कुटुंब माझ्यासोबत ठाम आहे. माझं काही झालं तरी लढणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. जरांगे यांच्या मुलींनी पप्पा आरक्षण मिळवतील, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत,असं म्हटलं. आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, असं जरांगे यांच्या मुलानं म्हटलं. आतापर्यंत साथ दिली, यापुढे देखील साथ देणार त्यांनी आरक्षण घेऊन यावं, असं जरांगेंच्या पत्नीनं म्हटलं.
मराठा समाज हे माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला की माझं कुटुंब समाधानी होणार आहे. समाज म्हणून ते भेटायला आलेत, कुटुंब म्हणून भेटायला आलेत, असं मनोज जरांगे म्हणाले.
माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी कुटुंबाला दूर लोटलंय. माझा समाज माझा मायबाप आहे. मी एक आरोळी ठोकली की १५ ते २० लाख मराठा समाज एका जागेवर आलाय. मी एकच आरोळी ठोकली की शीवंच्या बाहेर चाललोय, पुन्हा येईन की नाही हे नाही माहिती पण माझा विचार टिकवा, मी तुमच्यात असेन की नाही माहिती, माझ्या मराठा समाजाच्या आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागं हटायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मला १२३ गावांनी आणि अंतरवाली सराटीनं मला सांभाळलं, ज्या दिवशी मी शीव सोडली त्या दिवशी अंतरवाली सराटी रडत होतं. सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागं हटणार नाही, मुंबईकडे निघालोय आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News