खरं तर मकर संक्रात सणानंतर थंडीचा कडाका कमी होत असतो, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. शहराचे तापमान १२ अंश, तर वेण्णालेक, लिंगमळा परिसरात तापमान दहा अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर शहर थंडीने पुरते गारठले आहे.
मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये गेले तीन-चार दिवसांपासून गुलाबी थंडीचे वातावरण असून, हवेत चांगलाच गारवा आहे. थंड झुळूक घेऊन येणाऱ्या वाऱ्याने स्थानिकांसह पर्यटक काश्मीरचा फील अनुभवत आहेत. शहरात उबदार कपडे परिधान करून स्थानिकांसह पर्यटक पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तर नागरिक रस्ते, दुकान, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण मिळवत होते. शनिवार, रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या सकाळपासून वाढू लागली आहे.
जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, डिसेंबरच्या मध्यानंतर काही दिवस पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. मागील पाच दिवसांपासून किमान तापमानात सतत कमी होत गेले आहे. जिल्ह्याचा पारा घसरल्यामुळे बाजारपेठ, शेतीच्या कामावरही परिणाम झाला असला तरी रब्बी हंगामातील स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा पिकांना ही थंडी पोषक ठरणार आहे.
सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. सातारा शहराचा पाराही घसरला आहे. काही दिवसांपूर्वीच १८ अंशापर्यंत असणारे किमान तापमान तीन -चार दिवसांपासून घसरले आहे. त्यातच शनिवारी १२ अंश डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ असलेले कास ठोसेघर, कोयनानगर या परिसरातील तापमान घटले असून ते १३ अंश डिग्री सेल्सिअस आहे. सध्या तरी हे तापमान या वर्षातील नीच्चांकी ठरले आहे, तर या कडाक्याच्या थंडीने सकाळच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावल्याचे चित्र दिसत आहे.
सातारा शहरात गेल्या पाच दिवसात नोंद झालेले किमान तापमान
- १६ जानेवारी १२.४
- १७ जानेवारी १३
- १८ जानेवारी १२
- १९ जानेवारी ११.९
- २० जानेवारी १२