मिरा-भाईंदरमध्ये मृतदेहांची फरफट सुरुच! जोशी रुग्णालयातील शवागारात अतिरिक्त शवपेट्यांची प्रतीक्षा

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : भाईंदरच्या शासकीय भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागरात उपलब्ध शवपेट्या अपुऱ्या पडू लागल्याने येथे अतिरिक्त शवपेट्यांची व्यवस्था उभारण्याचे काही महिन्यांपूर्वी निश्चित करण्यात आले आहे. अद्याप हे काम सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी, नातेवाईकांना मृतदेह शवागरात ठेवण्यास मुंबईतील शासकीय रुग्णालयात जावे लागत आहे. उत्तनमधील नागरिकांना नुकतेच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.

मिरा-भाईंदरमध्ये पंडित भीमसेन जोशी रुग्णालय या एकमात्र ठिकाणी शवागार आहे. हे शवागार उभारून १५ हून अधिक वर्षे उलटली आहेत. त्यामुळे शवागारातील १२ पैकी तीन शवपेट्या दुरुस्तीयोग्य झाल्या आहेत, तर उर्वरित नऊ पेट्या वापरात आहेत. परंतु, शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता त्या अपुऱ्या ठरत आहेत. मनपाच्या गांधी रुग्णालयातील शवागारही काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहे.

परिणामी, मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह शवागारात ठेवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागेल. ह्याच कारणास्तव एक मृतदेह रात्रभर रुग्णवाहिकेत ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब ऑगस्ट महिन्यात समोर आली होती. त्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने अतिरिक्त काही शवपेट्या उभारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे.
गाझातील रुग्णालयांत पॅलेस्टिनी सोडताहेत प्राण; पुरेसे उपचार मिळत नसल्याने गंभीर स्थिती
याला तब्बल तीन महिने उलटले असूनही अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे बोलले जाते. जोशी रुग्णालयाच्या शवागारात जागा नसल्याने भाईंदरच्या उत्तनमधील मृत पावलेल्या एका खलशाचा मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकांना मुंबईतील शासकीय शताब्दी रुग्णालयात जावे लागले होते. ह्या गंभीर समस्येला आणखी किती दिवस सामोरे जायचे, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जोशी रुग्णालयात अतिरिक्त शवपेट्या उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला सादर करण्यात आला आहे. हे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.-डॉ. जाफर तडवी, जिल्हा शल्यचिकित्सक

जोशी रुग्णालयात अधिक शवपेट्या उभारण्याचे काम येत्या महिनाभरात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांसह व इतर अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.-आमदार गीता जैन, मिरा-भाईंदर

Source link

gandhi hospitalmira bhayander municipal corporationmira-bhayander newsPandit Bhimsen Joshi Hospitalपंडित भीमसेन जोशी रुग्णालयमिरा-भाईंदर महापालिकामिरा-भाईंदर महापालिका रुग्णालय
Comments (0)
Add Comment