सात महिने आम्ही वेळ दिला होता मात्र यापेक्षा आणखी सरकारचे मराठा समाजाने काय ऐकायचे? मुंबईला गेल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणार नाही त्यामुळे गावागावातून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मराठा पोरांच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना केले आहे. तुमच्या लेकराला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने झुंज द्यायला चाललोय असेही जरांगे यांनी सांगितले. एकाही मराठ्यांनी घरी न राहता आपली ताकत २६ जानेवारीला दाखवून दिली पाहिजे असे जरांगे म्हणाले
उपोषणामुळे माझे शरीर साथ देत नाही. मी असेन- नसेन माहित नाही मात्र मराठा समाजाची एकजूट फूटू देऊ नका असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच समाजाशी चर्चा करुन आजपासूनच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही जरांगे म्हणाले. आरक्षणासाठी मी माझा जीव पणाला लावण्याचे ठरविले आहे असे जरांगे यांनी स्पष्ट केले. नोंदी सापडूनही सरकार आरक्षण देणार नसेल तर मराठ्यांच्या पोरांना मोठं करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलावे लागणार आहे असे जरांगे म्हणाले
कधीतरी जीवाची बाजी लावायचीच आहे..
मराठा आंदोलनकर्ते आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. मोठ्या संख्येने मुंबईला चला असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी कधीतरी जीवाची बाजी लावायचीच असून त्यासाठी मुंबईला निघतानाच उपोषण करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. २६ जानेवारीनंतर मुंबईत आमरण उपोषण होणारच आहे पण त्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.
५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. मागील ४५ वर्षांपासून मराठा समाज लढतोय. करोडोंच्या संख्येने समाज असताना आणि अनेकांनी बलिदान दिलेले असतानाही सरकार निर्दयीपणे वागत आहे. नोंदी न मिळालेल्या लोकांना आरक्षण दिले आणि गोरगरीब मराठ्यांची पोरं मरायला लागली तरीही हक्काचे आरक्षण देऊ शकत नाही याच्यापेक्षा निर्दयीपणा काय आहे? असा सवाल जरांगे यांनी विचारला. आमच्या महिलांवर लाठीहल्ला झाला तरीही आम्ही संयमाने लढतोय. मुंबईला जाण्याची घोषणा करुन आज एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही हा अन्यायाचा कळस आहे असे जरांगे म्हणाले.यावेळी जरांगे यांचा कंठ दाटून आला तसेच जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.