शहरात ‘ट्रिपल’ बंदोबस्त; मंदिर प्राणप्रतिष्ठा, ठाकरेंच्या दौऱ्यासह मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि मराठा आरक्षण या अनुषंगाने शहरात तिहेरी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मिश्र लोकवस्तीत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून, राम मंदिरांसह सर्व धार्मिक ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यासह शहरातील सर्व भागात ‘फिक्स पॉइंट’वर नाकाबंदी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

उद्या, सोमवारी (दि. २२) अयोध्येत होणाऱ्या राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरासह शहरातील सर्वच ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरती, धार्मिक सोहळे, प्रवचन, ठिकठिकाणी सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व पोलिस ठाण्यांसह गुन्हे पथकांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील सर्व ठिकाणी गस्त वाढवून मंदिरांलगत बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. काळाराम मंदिरात आरतीसह सातपूर हद्दीत ठाकरे गटाचे महाअधिवेशन आहे. तसेच गोल्फ क्लब मैदानात ठाकरे यांची सभादेखील होणार आहे. त्यासंदर्भातही संबंधित पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा व वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. यासह मराठा आरक्षण आंदोलनासाठी नाशिकमधूनही शेकडो बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यासह नाशिकमार्गे इतर जिल्ह्यातून आलेले बांधव मुंबईकडे जातील. त्यामुळे महामार्गासह सर्व भागात योग्य बंदोबस्त ठेवत गस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे.
प्रभूराम त्यांना आशीर्वाद नव्हे, तर शाप देतील! निमंत्रणावरुन खासदार संजय राऊत यांची टीका
पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई पायी पदयात्रा करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने सर्व पोलिस घटकांना ‘ॲलर्ट’ दिला आहे. २० ते २८ जानेवारी या कालावधीत साप्ताहिक सुटीसह सर्व प्रकारच्या रजा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ वैद्यकीय रजा मान्य केल्या जातील. हा नियम पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना लागू असेल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील महत्त्वाच्या घटना आणि दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, राखीव पोलिस पथकांनाही सूचना केल्या आहेत. मिश्र लोकवस्तीत गस्त वाढवून काही ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ नेमले आहेत.- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे

Source link

ayodhya ram mandirkalaram mandir nashiknashik blockadeNashik newsNashik Policenashik police bandobastuddhav thackrey nashik visit
Comments (0)
Add Comment