काय घडलं?
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोड परिसरातील व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची आत्या सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. शनिवारी (दि. २०) सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे फिर्यादी यांच्या आत्याचा मृतदेह पंचनाम्यासाठी रुग्णालयातील ‘कॅज्युअल्टी’समोरील जागेत ठेवण्यात आला. शवविच्छेदनापूर्वी पंचनामा व कायदेशीर नोंदी करण्यासाठी पोलिस सिव्हिल हॉस्पिटलच्या चौकीत होते. नातलगही कागदपत्रांची पूर्तता करून पोलिसांना सहकार्य करीत होते. त्यावेळी मृतदेहावरील दागिने काढून घेण्यासंदर्भात नातलगांना पोलिसांनी सूचना केली. तेव्हा एक महिला नातलग दागिने काढण्यासाठी मृतदेहाजवळ गेली असता संशयित ‘कॅज्युअल्टी’समोर आला. रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे भासवून ‘शवविच्छेदन गृहात दागिने काढले जातात’, असे त्याने नातलगांना सांगितले. त्यानंतर मृतदेह झाकून नातलगांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयाबाहेर नातलग गेल्यावर संशयिताने मृतदेहाच्या गळ्यातील पंधरा हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरले. पंचनाम्यांची कागदपत्रे पूर्ण झाल्यावर नातलग पुन्हा मृतदेहाजवळ गेल्यावर दागिने नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित पोलिस अंमलदार प्राजक्त जगताप आणि शरद पवार यांना कळविले.
खाकीच्या धाकाने कबुली
संशयित सिव्हिलमध्येच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ‘खाकी’चा धाक दाखवला. तेव्हा त्याने चोरीची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाल्याने नातलगांनी त्यांचे आभार मानले.