शेलारची बुलेट प्रुफ कार जप्त
विठ्ठल शेलारकडे एक बुलेट प्रुफ कार आहे. ती पुनावळे भागातील एक फार्म हाउसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक गाडी जप्त करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यापूर्वीच ती गाडी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यात येत होती. पोलिसांनी पाठलाग करून ही गाडी जप्त केली. पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित पाच वाहने आतापर्यंत जप्त केली आहेत. दरम्यान, न्यायालयाने शेलार आणि मारणेच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.
मोहोळ खून प्रकरणात शेलार आणि मारणे यांना अटक करण्यात आली असून, ते पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी, २० जानेवारीला संपणार होती. त्याच्या पूर्वसंध्येला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. त्यानंतर शनिवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
तपास अधिकारी सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले, की आरोपींवर आणखी तीन गुन्हे दाखल झाले असून, ते पुढील तपासासाठी पौड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले, तर तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. अन्य एका फरारी आरोपीचा शोध या आरोपीच्या मदतीने घेणे बाकी आहे, असे सरकारी वकील नीलिमा इथापे यादव यांनी नमूद केले आणि आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
‘तपास कसा करावा, हे न्यायालय सांगू शकत नाही’
विठ्ठल शेलारची पुनावळे भागात धिंड काढण्यात आली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराला बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. हा व्हिडिओ पोलिसांनी ‘डिलिट’ करावा, अशी मागणी करण्यात आली. यावर पोलिसांनी तपास कसा करावा, हे न्यायालय सांगू शकत नाही. न्यायालय तपासावर देखरेख ठेवू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मात्र, तपास अधिकारी यांनी बचाव पक्षाच्या अर्जावर त्यांचे म्हणणे सोमवारपर्यंत न्यायालयात सादर करावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.