विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर साळवी यांची शनिवारी लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेतली व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. या सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले ‘लालबागचा राजा’ हे मुंबईतील एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे.
‘हा क्षण सर्वांसाठी मोलाचा आणि आनंदाचा आहे. प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीने यात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहभागी करून घेतले याचा आनंद आहे. मंडळाचे अध्यक्ष या निमंत्रणाचा सन्मान राखत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने ‘लालबागचा राजा’ मंडळ मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करत आहे याचा अभिमान आहे’, असे साळवी यांनी सांगितले.
चार लाख घरांत पोहोचल्या निमंत्रण अक्षता
अयोध्येच्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे नाशिक शहर समितीच्या माध्यमातून शहरातील लाखो घरांमध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता वितरीत करण्यात आल्या आहेत. १९८ वस्त्यांमधील जवळपास तब्बल चार लाखांहून अधिक घरांत सोहळ्याच्या अक्षता देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून तब्बल १६ लाखांहून अधिक नागरिकांना संपर्क साधण्यात आला आहे.
नाशिक शहर समितीच्या वतीने १ ते १८ जानेवारी या कालावधीत संपूर्ण शहरात ‘गृहसंपर्क अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अक्षतांसोबतच समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने एक माहितीपत्रक, मंदिराच्या संकल्पचित्राचे छायाचित्रही वाटप करण्यात आले. या अभियानात जवळपास साडेपाच हजारांहून अधिक रामसेवकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे सदर गृहसंपर्क अभियानात १,१०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. एक हजारहून अधिक नागरिक स्वइच्छेने यात सहभागी झाले. अभियानांतर्गत विविध साधूसंत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस अधिकारी, उद्योजक, बिल्डर, डॉक्टर, सीए, संपादक अशा अनेक मान्यवरांनाही निमंत्रण अक्षता देण्यात आल्या.
वातावरण झाले भक्तिमय
पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्त याच दिवशी आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन आनंदोत्सव साजरा करावा, त्याचप्रमाणे हा आनंदाचा प्रसंग असल्याने त्या दिवशी घरोघरी दीपमाळांची सजावट करावी, जवळच्या मंदिरात राम नामाचा जप करावा आणि सणासुदीसारखा दिवस साजरा करावा, असे आवाहन नाशिक शहर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी अनेक मंदिरात थेट प्रक्षेपणासह, पूजाअर्चा व सामूहिक आरती केली जाईल. अनेक सोसायटी, संस्थांतर्फे रामकथा, गीतरामायण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.