पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाबाबत राज्य सरकार काय करत आहे, हे सांगितले. राज्य सरकारच्या कामाला प्रतिसाद द्यावा, मुंबईकडे कूच करू नये, अशी मागणी केली. मागासवर्ग आयोगासंदर्भातील माहिती काढण्यासाठी काही वेळ लागतो आहे. परंतु जरांगे पाटील यांनी, जेवढा वेळ पाहिजे तेवढा दिलेला आहे, असे सांगत मुंबईकडे ते आता निघाले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. संविधानाचा आदर राखून प्रत्येक जण आपला निर्णय घेऊ शकतो. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी अजूनही थांबावे, अशी सरकारची इच्छा आहे. परंतु आज मराठा समाज ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटी प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे.
अयोद्धेतील श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी मुख्यमंत्री आणि मला निमंत्रण आले होते. परंतु अन्य मंत्र्यांना सोमवारी तेथे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापुढील काळात सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन अयोद्धेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तारीख ठरवून लवकरच आम्ही जाऊ असे सांगत अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ मंदिर उभारणीचे निश्चय केला. तो यानिमित्ताने पूर्णत्वाकडे जात आहे. राज्य शासनाने सुटी जाहीर केली असून शासकीय इमारतींवर रोषणाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पाण्याचे नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. सरकारने तात्काळ बैठक घेत पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली होती. यासंबंधी पवार यांना विचारणा केली असता त्यांनी नो कॉमेंटस म्हणत प्रश्न टाळला.