श्रीरंग बारणे यांनी मागच्या वर्षी मावळ लोकसभेवर आपली छाप सोडली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र श्रीरंग बारणे यांच्यासमोर पार्थ यांचा टिकाव लागला नाही. पार्थ यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. पार्थ यांचा पराभव हा अजित पवार यांना मोठा धक्का होता. त्यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होती. मावळ लोकसभेसाठी भाजप नेते बाळा भेगडे, उध्दव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे, पार्थ पवार हे इच्छुक उमेदवार आहेत.
मतदारसंघाची रचना झाल्यानंतर गजानन बाबर यांच्या रुपाने शिवसेनेला पहिला खासदार २००९ साली मिळाला. त्यावेळी शिवसेनेने आपली ताकद या मतदार संघात वाढवण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ साली श्रीरंग बारणे यांच्या रुपाने शिवसेनेला दुसरा खासदार मिळाला. मात्र शिवसेनेत फूट पडली आणि श्रीरंग बारणे शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले.
सर्वच पक्ष सक्रिय
मावळ लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली असून स्थानिक आमदारांनी राष्ट्रवादीचाच खासदार होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षातच खासदारकीसाठी शर्यत लागते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
संजोग वाघेरेंच्या एन्ट्रीने उद्धव ठाकरे गटाला उभारी
श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मावळ लोकसभेसाठी उमेदवार नव्हता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या हाताला अजितदादांचा शिलेदार लागल्याने त्यांची मावळ लोकसभेसाठीची चिंता मिटली असल्याचे बोलले जात असून उद्धव ठाकरे यांस मावळ लोकसभेची जागा जिंकून आणणारच असा शब्दच त्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि वाघेरे यांनी मावळ लोकसभेची तयारी सुरू केल्याचे दिसते आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे आपली पहिली सभा या मतदार संघात घेणार आहे.
शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची तयारी
मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीतून कोण लढणार, जागेची अदलाबदली होणार का? हे अद्याप जरी ठरलेले नसले तरी यात अंतिम लढत ही शिंदे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे. कारण ही जागा जिंकून उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला आपली ताकद दाखवून द्यायचा नक्कीच प्रयत्न करतील. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघामध्ये कोणते विधानसभा मतदारसंघ?
-चिंचवड
– पिंपरी
– पनवेल
– उरण
– कर्जत
– मावळ