अजित पवार म्हणाले, चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि अन्य महत्त्वाची पदे आल्यानंतर सुद्धा बारामतीत इतके काम झाले नव्हते. दुर्दैवाने मोठ्या योजना मंजूर होऊ शकल्या नव्हत्या. मी मात्र त्यात जातीने लक्ष घातले. एकट्या बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे ६५ कोटींची कामे सुरु आहेत, वस्त्रोद्योग मंडळाकडून ९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बारामती बाजार समितीचा सेस फंड किती आहे, इतर बाजार समित्यांची अवस्था आज काय आहे, याची जरा माहिती घ्या, असे सांगून पवार म्हणाले, समितीने सुप्यात जागा घेतली. परंतु ती खड्ड्यात होती. तेथील तलावाचे खोलीकरण करत असताना ती जागा भरून काढली. सुपा व सुपा परगणा परिसरातील गावांमध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना याची १ हजार कोटींची कामे सुरु आहेत. लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. एका आमदाराला वर्षाला पाच कोटींचा निधी मिळतो, इथे हजारो कोटींची कामे सुरु आहेत.
मला अनमोल साथ दिली, बारामतीकरांनो आभार!
सुदैवाने तुम्हा सगळ्यांनी मला ३०-३२ वर्षे राजकीय जीवनात साथ दिली. खासदार, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे त्यातून मिळाली. मला त्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी समजल्या. कोणकोणत्या विकासकामांसाठी कसा पाठपुरावा करायचा, कशा प्रकारे निधीची तरतूद करायची, बजेटमध्ये कामे कशी घालायची, पुरवणी मागणीतून निधी कसा आणायचा हे मला समजले. त्यातून अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, भटक्या समाजाला, बेघर लोकांसाठी घर बांधणी कार्यक्रम आदींसाठी भरीव निधी आणला असल्याचे ते म्हणाले.
…तर नावाचा अजित पवार नाही!
रविवारीच एका कंपनीच्या सीएसआर फंडातून ६० रुग्णांच्या डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही सेवा दिली जात आहे. मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांवर चांगले उपचार होत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मेडदला म्हाडाची जागा वेढ्या बाभळींनी वेढली होती. तिथे आपण आयुर्वेद कॉलेजची भव्य इमारत उभी करत आहोत. ते पूर्ण झाल्यावर आपण मेडदमध्ये आहोत की कुठे? असे लोक म्हटले नाहीत तर नावाचा अजित पवार नाही असेही पवार म्हणाले.
दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटी
राज्य सरकारने ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. बारामती तालुक्याचा त्यात समावेश आहे. या ४० तालुक्यांसाठी आम्ही केंद्राकडे २६०० कोटींची मागणी केली आहे. त्यांचे पथक येवून पाहणी करून गेले आहे. त्या कमिटीचे प्रमुख हे गृहमंत्री अमित शाह हे आहेत. हे पथक पाहणी करून येवून गेल्यानंतर आम्ही शाह यांनाही भेटलो. राज्याला कसा जास्तीत जास्त निधी मिळेल यासाठीचे प्रयत्न आम्ही त्या भेटीत केले आहेत अशी माहिती पवार यांनी दिली.