हृदयात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘शिवसेना (उबाठा) आणि भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक असून, हृदयात राम आणि हाताला काम’ हे आमचे हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून बलात्काऱ्यांना फासावर चढविले जाते; परंतु भाजपचे हिंदुत्व हे बलात्काऱ्यांचा सत्कार करते,’ असा घणाघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला.

युवासेनेतर्फे सणस मैदानावर आयोजित ‘युवा खेळ समिट’ महोत्सवाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर मैदानाबाहेर कर्मवीर भाऊराव पाटील चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर व चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.

या वेळी आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली.
प्रभूराम त्यांना आशीर्वाद नव्हे, तर शाप देतील! निमंत्रणावरुन खासदार संजय राऊत यांची टीका
‘पुणे शहरात दोन वर्षे प्रशासक राज असून, दररोज कचरा उचलला जात नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत, पाणी तुंबत आहे, नदीकाठ विकसन प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे नदीपात्र उद्‌ध्वस्त होत आहे. नागरिकांचा आवाज ऐकला जात नाही. दावोसमध्ये मजा मारणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हा आवाज ऐकू जाणार नाही; परंतु जनतेच्या मतांचा खणखणीत आवाज ऐकू जाईल,’ असेही ठाकरे म्हणाले.

…‘महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द करण्यात आले. लोहगाव विमानतळाची नवीन इमारत चार महिन्यांपासून बांधून तयार असूनही, खोके सरकारला उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीश्वर महाशक्ती वार करीत असतानाही, महाराष्ट्राची माती लढण्याची प्रेरणा देत असून, महाराष्ट्राला आडवे जाणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही. – आदित्य ठाकरे

Source link

aditya thackreyPune newsshiv senashivsena uddhav balasaheb thackerayshivsena uddhav thackeray vs eknath shindeshivsena vs bjpyuva khel sammit
Comments (0)
Add Comment