लालकृष्ण अडवाणी यांचे भाषण संपत होते. ते आवाहन करीत होते की ‘भीड मत करो, सब के दर्शन हो जाएंगे’ आणि त्याच वेळी कारसेवकांनी घुमटावर चढायला सुरुवात केली. बघता बघता पूर्ण घुमट कारसेवकांनी भरून गेला. पहिला घुमट पडला आणि दुसऱ्या घुमटाजवळ आम्ही होतो. आमच्यासमोर दुसरा घुमटही पडला. आम्ही तेथून पळालो. एक क्षणही तेथे थांबलो असतो, तरी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलो असतो.- डॉ. राजेश नाशिककर
मी एक ड्रेस व सतरंजी घेऊन घरात कोणाला न सांगता अयोध्येला निघून गेलो. रेल्वे स्टेशनवर सोडवायला आलेल्या मित्रांकडे गळ्यातली चेन, रुद्राक्ष, घड्याळ आणि हातातले कडे देऊन मी अयोध्येला गेलो आहे, असा निरोप घरी द्यायला लावला. सहा डिसेंबरला आम्हाला तेथे उभारलेल्या संरक्षण भिंतीवर कारसेवकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मिळाली. अचानक ढाच्याजवळ गोंधळ चालू झाला. काही कारसेवक भगवा ध्वज हाती घेऊन ढाच्यावर चढले होते. आमचेही नियंत्रण सुटले. ज्या कामासाठी आलो होतो, ते काम आम्हाला समोर खुणावत होते.- नरेंद्र दशपुते
अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, साध्वी ऋतंभरा, साध्वी उमा भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह हो. वे. शेषाद्री असे अनेक मान्यवर उपस्थित होते. भाषणे सुरू असताना काही उत्साही कारसेवक त्या वादग्रस्त ढाच्यावर चालून गेले. सभेत गडबड सुरू झाली. मंचावरील नेते सर्वांना शांत करीत होते. न्यायालयीन आदेशाचा आपण मान ठेवूया, असा आग्रह करीत होते. परंतु, कित्येक शतकांचा अपमान हा कारसेवकांच्या उत्साहाला थांबवू शकत नव्हता.- दिलीप क्षीरसागर
सर्व कारसेवकांचे एकच ध्येय, एकच नारा होता, ‘रामलला हम आये है, मंदिर यही बनायेंगे’ व ‘अभी नही तो कभी नही’, अशा अनेक घोषणांनी अंगात ऊर्जा संचारत होती. मी सहा डिसेंबरला प्रत्यक्ष घुमटाच्या आवारात सकाळी पाच ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होतो. काम यशस्वी झाल्यावर आमच्या तंबूत परतलो. हेच खरे जीवनाचे सार्थक म्हणावे लागेल. आमचे जीवन धन्य झाले आहे.- रमेश मानकर
काही कारसेवकांनी कुदळी, फावडे, पहारी अशी तोडकामाची हत्यारे आधीच दडवून ठेवलेली होती. ती बाहेर काढली. सर्वात प्रथम जो चढला, त्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकावला. आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले. १२ वाजून ११ मिनिटांच्या नियोजित कारसेवेच्या मुहूर्तापूर्वीच घुमटावर छिन्नी, हातोडे, टिकाव, फावडे इत्यादीचे घाव पडू लागले आणि १२.२५ पर्यंत ढाच्याची एक भिंत साफ झाली.- अशोक जुनागडे