म. टा. प्रतिनिधी, मुंबईः अत्यावश्यक सेवेकऱ्यांसह दोन लसमात्रा घेतलेल्यांना मासिक पासने लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांना तिकीट देण्याबाबत केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही. राज्य सरकारने त्याबाबत प्रस्ताव पाठवल्यास त्याला तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी दानवे यांनी सीएसएमटी मुंबई ते दादर असा लोकलच्या द्वितीय दर्जाच्या डब्यातून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. त्यावेळी लसधारक प्रवाशांनी लोकलचे तिकीट मिळत नसल्याची खंत त्यांच्याकडे व्यक्त केली होती. लसधारकांना एक दिवसांच्या रेल्वे प्रवासासाठीही सध्या मासिक पास घेणे बंधनकारक आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि वाढलेल्या इंधनदरामुळे रस्ते प्रवास दिवसेंदिवस अत्यंत खडतर होत आहे. यामुळे एका दिवसाच्या प्रवासासाठी लसधारकांना तिकीट उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.